महिला पोलीस उपनिरिक्षकाला लाच घेताना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलीस ठाण्याच्या एका महिला पोलीस उपनिरिक्षकाला लाच घेताना अटक केली आहे. शुभांगी गुणवंतराव ढगे (30) असे या लाचखोर महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. ढगे यांनी एका आरोपीवर कारवाई न करण्यासाठी तसेच त्याचा ताब्यात घेतलेला मोबाईल परत देण्याकरिता लाच मागितली होती.

भद्रावती पोलीसठाण्यात प्रेम प्रकरणातून झालेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी व तक्रारदाराचा ठेऊन घेतलेला मोबाईल परत देण्याकरिता ढगे यांनी आरोपीकडे 70 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर निश्चित झालेली 40 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ढगे यांना रंगे हाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश दुद्लवार, विजय माहुलकर, डी. एम.घुगे, पुरुषोत्तम चोबे याच्या पथकाने केली.