
पहिल्यांदाच फायनल खेळत असलेल्या पोरींच्या डोळ्यांत जगज्जेतेपदाचं स्वप्न होतं. साखळीत हरवलेल्या गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला आपल्या पोरी पुन्हा धूळ चारतील अन् जगज्जेतेपदाचा करंडक जिंकून इतिहास घडवतील अशी तमाम देशवासीयांना आशा होती, मात्र जेतेपदाच्या लढतीचं दडपण हिंदुस्थानी महिला संघाला पेलवलं नाही. आक्रमक अर्धशतके ठोकलेल्या ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांचे झेल सोडले अन् हिंदुस्थानचे जगज्जेतेपदाचे स्वप्न भंगले. सुपर फॉर्ममध्ये असलेली शफाली शर्मा अंतिम लढतीत अपयशी ठरली. स्मृती मंधाना व कर्णधार हरमनप्रीत कौर यांना अखेरच्या लढतीतही आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. याउलट ऑस्ट्रेलियाने सर्वच आघाडय़ांवर सरस खेळ करीत 85 धावांनी विजय मिळवून तब्बल पाचव्यांदा महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा करंडक जिंकण्याचा पराक्रम केला. 75 धावांची वादळी खेळी करणारी एलिसा हिली या सामन्याची मानकरी ठरली, तर मालिकावीरांगनेचा बहुमान बेथ मूनी हिला मिळाला.
आघाडीचे 5 फलंदाज 58 धावांत माघारी
ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या 185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानचा डाव 19.1 षटकांत 99 धावांतच गारद झाला. आव्हानात्मक धावसंख्येच्या दडपणाखाली आघाडीच्या पाच फलंदाज 58 धावांत माघारी परतल्याने हिंदुस्थानला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. स्पर्धेत प्रत्येक लढतीत हिंदुस्थानला आक्रमक सुरुवात करून देणारी शफाली वर्मा तिसऱ्याच चेंडूवर बाद झाली. मेगन शूटच्या चेंडूला कट करण्याच्या नादात तिने यष्टीमागे हिलीकडे सोपा झेल दिला. तिच्या जागेवर आलेल्या तानिया भाटियाच्या हेल्मेटला जेस जॉन्सेनचा चेंडू लागल्याने ती 2 धावांवर रिटायर्ड हर्ट झाली. मग आलेली जेम्स रॉड्रीग्ज भोपळाही न फोडता जॉन्सेनच्याच गोलंदाजीवर तंबूत परतली.
मधल्या फळीचा प्रतिकार
आघाडीची फळी तंबूत परतल्यानंतर दीप्ती शर्मा (33), वेदा कृष्णमूर्ती (19) व रिचा घोष (19) या मधल्या फळीतील फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा थोडाफार प्रतिकार केला. रिटायर्ड हर्ट झालेल्या तानिया भाटियाच्या जागेवर रिचा घोष बदली फलंदाज म्हणून आली होती. या तिघी बाद झाल्यानंतर मेगन शूटने शेपटाला गुंडाळून हिंदुस्थानचा डाव संपविला.
दिशाहीन गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण
नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यानंतर दिशाहीन गोलंदाजी आणि गचाळ क्षेत्ररक्षणामुळे हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियावर दडपण टाकण्याची संधी गमावली. एलिसा हिली (75) व बेथ मूनी (नाबाद 78) यांनी 115 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला खणखणीत सलामी दिली, मात्र दीप्ती शर्माच्या पाचव्याच चेंडूवर शफाली वर्माने एलिसाचा सोपा झेल सोडला, तर राजश्री गायकवाडने स्वतःच्या गोलंदाजीवर मूनीचा झेल सोडला.
हिंदुस्थानसाठी उपविजेतेपदही नसे थोडके
हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाने अलीकडच्या काळात चांगलीच कात टाकली आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही हिंदुस्थानने अंतिम फेरीत धडक दिली होती. त्यावेळी चुरशीच्या लढतीत हार पत्करावी लागल्याने हिंदुस्थानला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. टी-20 विश्वचषक स्पर्धेतही हिंदुस्थानचे जेतेपदाचे स्वप्न भंगले असले तरी उपविजेतेपद मिळविणे ही देखील मोठी कामगिरी होय.
शेफाली ठरली सर्वात युवा क्रिकेटपटू
हिंदुस्थानची सलामीची फलंदाज शफाली वर्मा वर्ल्ड कप खेळणारी सर्वात युवा (महिला व पुरुष) क्रिकेटपटू ठरली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फायनल खेळलेली शफाली 16 वर्षे 40 दिवस वयाची आहे. याआधी वेस्ट इंडीजची शकाना क्वीनटाईन 2013मध्ये वर्ल्डकपची फायनल खेळली तेव्हा 17 वर्षे 45 दिवसांची होती.



























































