
>> मधुरा नेने
सुमारे 40 वर्षांपूर्वी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाच्या प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निकची स्थापना गरजू व होतकरू महिलांना कौशल्यविकासातून रोजगाराच्या चांगल्या संधी मिळवून देण्यासाठी केली गेली. या आगळ्या वेगळ्या पॉलिटेक्निकमध्ये विविध क्षेत्रांशी निगडित डिप्लोमा कोर्सेस आहेत, जसे ऍडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस, फूड टेक्नॉलॉजि, फॅशन डिझाईनिंग, इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल लॅबोरेटोरी, फार्मसी, इंटिरिअर डिझाईनिंग एव्हढेच नव्हे तर हिंदुस्थानात पहिल्यांदा ऑप्थअल्मिक टेक्नॉलॉजी आणि ज्वेलरी डिझाईनिंग सारखे कोर्सेस या पॉलिटेक्निकमार्फत सुरू झाले. काळाची गरज ओळखून व मुलींचं शिक्षण मर्यादित राहू नये म्हणून सगळे कोर्सेस डिग्री प्रोग्रॅम्सशी निगडित आहेत. प्रसिद्ध डिझाइनर नीता लुल्ला, मसाबा गुप्ता, अनिता डोंगरे, मधुरा भोगले पहिली महिला डिझेल इंजिन ड्राइव्हर मुमताज काझी, डेबोन हरबलच्या मालक काजल आनंद, फिल्मफेअर अवॉर्ड विजेती शर्मिष्ठा रॉय अशा अनेक कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी आपापल्या क्षेत्रात चांगल्या नावारूपाला आल्या आहेत.
या पॉलिटेक्निकमध्ये शिकणाऱया बऱयाच विद्यार्थिनी या मध्यम व निम्न मध्यमवर्गीयांतील आहेत. या मुली अल्पवयीन वयात स्वावलंबी होण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी या डिप्लोमा कोर्सेसमध्ये नावनोंदणी करतात.
याशिवाय या कॉलेजतर्फे एनएसएस, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रू पॉलिटेक्निक असे समाजोपयोगी उपक्रमही राबवले जातात. त्यामार्फत जे कॉलेजला येऊ शकत नाहीत आणि गरजू आहेत अशा उमेदवारांपर्यंत कौशल्य प्रशिक्षणाचे वेगवेगळे उपक्रम व कोर्सेस राबवले जातात.






























































