नीरज चोप्राची जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या सुवर्णपदक विजेत्या भालाफेक चॅम्पियन नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आपल्या पहिल्याच थ्रोमध्ये 88.39 मीटरच्या थ्रोसह त्याने अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. रविवारी तो भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.05 वाजता पदक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. स्पर्धेतील इतर स्पर्धकांपेक्षा नीरजचा थ्रो सर्वोत्कृष्ट ठरला असून 88.39 मीटरच्या थ्रोसह तो पहिल्या क्रमांकावर आहे.

नीरज चोप्रा हा प्रथमच जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी 2017 मध्ये त्याने या चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता. परंतु 82.26 मीटरच्या थ्रोमुळे तो अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नाही. तसेच 2019 मध्ये हाताच्या शस्त्रक्रियेमुळे तो स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. नुकतेच नीरजने डायमंड लीगमध्ये रौप्यपदक जिंकले होते. नीरजने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्याने, आता रविवारी नीरज या स्पर्धेत पदक पटकावणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.