आज जागतिक पुस्तक दिन, फेसबुकवर जमला वाचनवेडय़ांचा ग्रुप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपण ठरवलं तर सोशल मीडियाचा वापर खूप चांगल्या पद्धतीने वापर करता येतो. फेसबुकवरील ‘वाचनवेडा’ हा ग्रुप बघितला की हे अगदी तंतोतंत पटतं. पुस्तकप्रेमींनी एकत्र येऊन वाचनवेडा (पुस्तकं वाचणाऱया प्रत्येकाचा ग्रुप) तयार केलाय. अल्पावधीतच हा ग्रुप वाचनवेडय़ांमध्ये लोकप्रिय झाला असून सध्या दोन लाख 54 हजार सदस्य जोडले गेलेले आहेत.

लॉकडाऊनमध्ये लोक पुन्हा वाचनाकडे वळले. कपाटात ठेवलेली पुस्तके हातात आली. भरपूर वेळ असल्याने लोकांना पुस्तके वाचायची होती. मात्र नेमकी कोणती पुस्तके वाचावीत, लेखक कोणते, ही पुस्तके कशी मिळतील, असे अनेक प्रश्न होते. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ‘वाचनवेडा’ या ग्रुपवर सदस्यांना मिळू लागली. त्यामुळे अधिकाधिक सदस्य या ग्रुपशी जोडले गेले.

वाचववेडा ग्रुपवर लेखक, विचारवंत यांच्यापासून सामान्य वाचक सदस्य आहेत. पुस्तक-वाचनासंबंधी विविध मुद्दय़ांवर या ग्रुपवर चर्चा होते. एखाद्या वाचलेल्या पुस्तकाचे मुखपृष्ठ शेअर करून पुस्तक कसे आहे याचा अभिप्राय दिला जातो, पुस्तक परीक्षण केले जाते. तसेच नामांकित लेखकांच्या गाजलेल्या पुस्तकांसोबत नवोदितांची पुस्तके व त्याविषयी माहिती दिली जाते. लहान मुलांना गिफ्ट देण्यासाठी पुस्तके सुचवण्यास सांगितले जाते.

‘पुस्तक भिशी’ला चांगला प्रतिसाद

‘पुस्तक भिशी’ सारखे उपक्रमही फेसबुकवर सुरू आहेत. पैशांची जशी भिशी असते व त्यात आपला नंबर आल्यावर पैसे मिळतात त्याचप्रमाणे पैशांऐवजी ‘पुस्तक भिशी’मध्ये पुस्तके मिळतात, ती पण सवलतीच्या दरात. यासाठी सदस्यांकडून आठवडय़ाला ठरावीक रक्कम गोळा केली जाते. त्यानंतर त्याच्या आवडीच्या पुस्तकांची यादी मागवली जाते. या यादीतील पुस्तके सदस्यांचा नंबर आल्यावर त्यांच्या पत्त्यावर पाठवली जातात.