
‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सर्वांचं सेम असतं’, असे आजची तरुणाई म्हणताना दिसते. प्रेमाला वयाचे, जाती-धर्माचे आणि रंग-रुपाचे बंधन नसते याचाच प्रत्यय सध्या एका जोडीकडे पाहून येत आहे. अमेरिकेत राहणारी 32 वर्षीय सैसी केसी (Sassee Cassee) नावाची तरुणी एका 19 वर्षीय मुलाच्या प्रेमात पडली आहे.
दोघांच्या वयामध्ये जसे अंतर आहे, तसे दिसण्यातही आहे. सैसी ही 2.10 फुटाची असून तिचा प्रियकर 5.7 फुटाचा आहे. ब्लेक (Blake) असे तिच्या प्रियकारचे नाव आहे. सैसी ही बारमध्ये काम करते आणि आपल्या छोट्या उंचीमुळे आणि उंच प्रियकरामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.
या जोडीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्या उंचीवरून आम्हाला हिणवले जाते. सोशल मीडियावर आम्हाला द्वेषाचाही सामना करावा लागतो. असे असले तरी आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. लवकरच ब्लेक आणि सैसी विवाहबंधनातही अडकणार आहेत.
दोघांच्या नात्याबाबत बोलताना ब्लेक म्हणतो की, ‘सैसी केसी (Sassee Cassee) हिचा स्वभाव मृदू आहे. ती मला आनंदी ठेवती आणि तिला लोकांना आनंदी ठेवता येते. मला तिच्या उंचीबाबत काहीही पडलेले नाही आणि तिचे वय जास्त आहे याचेही मला काही देणेघेणे नाही. आमचे नाते इतर जोड्यांसारखेच आहे.’ दुसरीकडे सैसी केसी (Sassee Cassee) हिने देखील ब्लेक आपली खूप काळजी घेतो आणि खूप प्रेम करतो असे म्हटले आहे. गेल्या वर्षी फेसबुकवर दोघांची ओळख धाली होती आणि एक महिने डेटिंगनंतर त्यांनी कायमचे एकमेकांसोबत राहण्याचे ठरवले.
याबाबत डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, सैसी केसी (Sassee Cassee) लहान असताना डॉक्टरांनी तिला Cartilage-Hair Hyperplasia असल्याचे सांगितले. यामुळे हाडांची लांबी वाढत नाही आणि माणूस खुजा होतो. सैसीची देखील उंची कमी असली तरी स्वत: कमावते आणि आपण कमकूवत नसल्याचे दाखवून देते. तिच्या इन्स्टाग्राम पेजवर तब्बल 2 लाख फॉलोअर्स देखील असून फोटो आणि व्हिडीओद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.






























































