कार-बाईक, विमानानंतर आता ‘इलेक्ट्रिक कंटेनर जहाज’ही आले; टेस्लाच्या 100 कार इतकी आहे बॅटरी क्षमता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इलेक्ट्रिक वाहनाचे ट्रेंड आता वाढताना दिसत आहे. आतापर्यंत तुम्ही इलेक्ट्रिक चारचाकी, दुचाकी आणि विमान पाहिले असेल. मात्र आता इलेक्ट्रिक कंटेनर जहाज देखील पाहायला मिळणार आहे. फर्टिलायझर कंपनी Yara ने जगातील पहिले इलेक्ट्रिक कंटेनर जहाज बनवले आहे. कंपनी आपले हे जहाज नॉर्वे आणि साऊथ कोस्टा येथे उतरवणार आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने या जहाजाची निर्मिती करण्यात आली आहे. कंपनीने याचे नाव Yara Birkeland असे ठेवले आहे.

1,000 टन कार्बन उत्सर्जन होणार कमी

Reuters च्या वृत्तानुसार, Yara Birkeland electric ship च्या मदतीने दरवर्षी 1,000 टन कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे. येत्या दोन वर्षांत हे जहाज पूर्णपणे ऑटोनॉमस होणार आहे.

स्वयंचलित तंत्रज्ञानासह करेल काम

जहाज स्वयंचलित तंत्रज्ञानासह कार्गो लोड आणि अनलोड करेल. तसेच हे जहाज आपली बॅटरी स्वतः रिचार्ज करेल आणि नेव्हिगेट करेल. या जहाजात उत्तम सेन्सर बसवण्यात आले आहेत, जे इतर जहाजे आणि समुद्रातील खडक ट्रॅक करू शकतात. कंपनीच्या योजनेनुसार, हे जहाज आठवड्यातून दोन फेऱ्या करेल. एकावेळी 20 फूट खताचे 120 कंटेनर वाहून नेण्याची क्षमता या जहाजात आहे.

टेस्लाच्या 100 कार इतकी आहे बॅटरी क्षमता

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, याची बॅटरी स्वित्झर्लंडची कंपनी Leclanche ने बनवली आहे. यात आठ बॅटरी पॅक कक्ष बनवण्यात आले आहेत. या बॅटरी 7 मेगावॅट वीज निर्माण करतात. एका रिपोर्टनुसार, या जहाजात वापरण्यात आलेल्या बॅटरीची क्षमता सुमारे 100 टेस्ला कार एवढी आहे.