
गाझियाबाद येथील शिवशक्ति धाम मंदिराचे पुजारी यति नरसिंहानंद सरस्वती यांनी भाजपच्या महिला नेत्यांविषयी अत्यंत आक्षेपार्ह विधान केल्याने वाद उफाळला आहे. या विधानाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
नरसिंहानंद सरस्वती एका लाईव्ह मुलाखतीसाठी बसले होते. पण, मुलाखत सुरू होण्यापूर्वी त्यांनी जे विधान केलं ते तिथेच उपस्थित एका माणसाने चित्रीत करून व्हायरल केलं. हा व्हिडीओ 4 जुलै रोजीचा असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या व्हिडीओत त्यांनी राजकारणातील महिलांविषयी अत्यंत आक्षेपार्ह विधानं केली आहेत. तसंच भाजपमधील महिला नेत्यांविषयीही त्यांनी गलिच्छ वक्तव्य केली आहेत.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री तजिंदर पाल सिंह बग्गा यांनी कारवाईची मागणी केली आहे. तसंच राष्ट्रीय महिला आयोगानेही त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून उत्तर प्रदेश पोलिसांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.



























































