
>> प्रसाद नायगावकर, यवतमाळ
यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून याची ओळख आहे. असमानी आणि सुलतानी संकटानी बळीराजा पुरता जेरीस आला आहे. उत्पन्नापेक्षा लागवडीचा खर्च जास्त येतोय. यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. यामुळे शेतकरी आत्महत्या सत्र थांबता थांबत नाही. अशातच जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून टेंभूरदरा येथील 34 वर्षीय युवा शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.
भिकू प्रताप जाधव असे मृतकाचे नाव आहे. या शेतकऱ्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दोन लाख 15 हजारांचे कर्ज असल्याची माहिती पुढे येत आहे. त्याच्याकडे साडेतीन एकर जमीन असून यंदा अतिवृष्टीमुळे पीक हाती आले नाही. कीडरोगामुळे सोयाबीनचेही उत्पादन झाले नाही.
बोंड अळ्यांमुळे कापूस उत्पादन संकटातआहे. त्यामुळे या शेतकऱ्याने नैराश्यातून आत्महत्या केली आहे.नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून व गत आठवड्यातच नारळी येथील शेतकऱ्याने अशाचप्रकारे आत्महत्या केली होती.
भिकू जाधव या शेतकऱ्यामागे एक मुलगी एक मुलगाव पत्नी आहे. घरातील कर्त्यापुरुषाने आत्महत्या केल्यामुळे या कुटुंबाला शासनाकडून तत्काळ मदत देण्याची मागणी पुढे येत आहे. याबाबत बिटरगाव पोलिस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बनसोड अधिक तपास करीत आहेत.





























































