VIDEO: योगी मोदींच्याही एक पाऊल पुढे… मुसलमानांची टोपी हातातही घेतली नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वाराणसी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील मुसलमानांची टोपी घालण्यास सर्वांदेखत नकार दिल्याचे समोर आले आहे. योगींनी टोपी घातली तर नाहीच पण त्यांनी टोपी हातात घेण्यास देखील नकार दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आज संत कबीर यांच्या ६२० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशमधील मगहर जिल्ह्यातील कबीर यांच्या समाधीस्थानाला भेट देणार आहेत. तसेच या ठिकाणी ते संत कबीर दास अॅकॅडमीची पायाभरणी देखील करणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी सर्व व्यवस्था चोख झाली आहे का हे पाहण्यासाठी योगी आदित्यनाथांनी संत कबीरांच्या समाधीस्थानाला भेट दिली. यावेळी तेथील मौलवी खादीम हुसैन यांनी योगींना मुसलमानांची लोकराची टोपी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र योगींनी तात्काळ त्या मौलवींना तसे करण्यापासून रोखले. त्यानंतर मौलवींनी ती टोपी हातात घेण्याची विनंती केली तेव्हा देखील योगींनी फक्त त्या टोपीला हात लावत फोटो काढला व तशीच ती परत दिली. योगींनी ती टोपी हातात देखील घेतली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या या व्हिडीओवर काँग्रेने जोरदार टीका केली आहे. ‘योगींना मुसलमानांचा सन्मान राखण्यासाठी ती टोपी घालायला हवी होती. त्यांनी ती टोपी घातल्याने ना त्यांचे धर्मपरिवर्तन होणार होते ना त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार होत्या’, अशी टिका काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी केली आहे.