
इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना वाकोला परिसरात घडली. सुशीलकुमार सिंग असे मृताचे नाव आहे. वाकोला पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
सुशीलकुमार हा नोकरी गेल्याने नैराश्यात होता. नैराश्यामुळे त्याला दारूचे व्यसन लागले. तो भावाच्या घरीदेखील राहत नसायचा. रविवारी दुपारी सुशीलकुमार हा वाकोलाच्या यशवंत नगर येथील एका इमारतीजवळ आला. सुरक्षा रक्षकाची नजर चुकवून तो इमारतीच्या सातव्या मजल्यावर गेला. दारूच्या नशेत असलेल्या सुशीलकुमारचा तोल गेल्याने तो खाली पडला.
हा प्रकार सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आला. त्याने याची माहिती वाकोला पोलिसांना दिली. काहीच वेळात पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी सुशीलकुमारला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.






























































