
दुचाकी स्लिप झाली आणि थेट 20 फूट ड्रेनेजमध्ये जाऊन पडल्याची घटना सांगली शहरातील कत्तलखाना परिसरात घडली. महापालिकेच्या वतीने ड्रेनेज दुरुस्तीचे काम सुरू आहे. याच उघडय़ा ड्रेनेजमध्ये एक दुचाकीस्वार पडला. मात्र, सुदैवाने यामध्ये गंभीर दुखापत झाली नाही.
सांगली शहरातल्या कत्तलखाना परिसरात महापालिकेच्या वतीने ड्रेनेज बांधकाम सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या ठिकाणी ड्रेनेजसाठी मोठय़ा प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. अद्यापि ड्रेनेजचे काम पूर्ण झालेले नाही, त्यामुळे भली मोठी ड्रेनेज उघडीच आहेत. अशा परिस्थितीतच नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करावे लागत आहे. यातूनच एका दुचाकीस्वाराला आपला जीव गमावण्याची वेळ आली होती. विनायक कांबळे हा कत्तलखाना रोडवरून जात असताना पावसामुळे चिखल निर्माण झाल्याने त्याची दुचाकी घसरली. त्यानंतर विनायक उघडय़ा असलेल्या 20 फूट खोल ड्रेनेजमध्ये पडला. परिसरातील नागरिकांनी ड्रेनेजमध्ये पडलेल्या विनायकला शिडी लावून सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने या अपघातामध्ये विनायकला फारशी गंभीर दुखापत झाली नाही. केवळ दैव बलवत्तेवर विनायक कांबळे हा बचावला आहे. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या गलथान कारभारा विरोधात संताप व्यक्त केला आहे. उघडय़ा जीवघेणे ड्रेनेजच्या बाबतीत कोणतीच खबरदारी पालिकेच्या वतीने घेण्यात आली नाही. त्यामुळे हा अपघात घडला आहे. त्यामुळे तातडीने ही ड्रेनेजची सर्व कामे पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.































































