
सामना प्रतिनिधी । मुंबई
माहीमच्या हिंदुजा रुग्णालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या समुद्रकिनाऱयाच्या खडकांमध्ये बुधवारी सायंकाळी एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्या तरुणाचा गळा चिरून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह तेथे फेकल्याचे माहीम पोलिसांचे म्हणणे असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.
अफसर खान (34) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. तो कळंबोली येथे राहत होता. बुधवारी सायंकाळी समुद्रकिनाऱयावरील खडकांमध्ये अफसरचा मृतदेह सापडला होता. त्याच्या गळय़ावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आहेत. त्यामुळे हत्या करून त्याचा मृतदेह तेथे फेकला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी माहीम पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. समुद्रकिनारी मृतदेह फेकण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. माहीम पोलीस तसेच क्राइम ब्रँचचे अधिकारी अफसरला कोणी व कोठे मारले, त्याचा मृतदेह येथे कोणी आणून टाकला याचा तपास करीत आहेत. यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच मोबाईल नंबर आदीचा तांत्रिक बाबीनेदेखील शोध घेत आहेत.






























































