जातिवाचक शिवीगाळ करून दलित तरुणाचा खून, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी, अंबड

पाणी फिल्टर प्लॅन्टवर कामास असलेल्या एका 27 वर्षीय दलित तरुणास जातीवाचक शिवीगाळ करून त्याची हत्या केल्याची घटना अंबड येथे घडली आहे. अनिल नितीन नाटकर (27, रा.पारडगांव ता.घनसावंगी जि.जालना) असे खून झालेल्या तरुणाचे नांव आहे. त्याला बळजबरीने फिल्टर प्लॅन्टच्या कामावर नेऊन त्याच्या डोक्यावर, हातावर हत्याराने मारून त्याचा खुन केल्याची घटना 12 जून रोजी घडली. या प्रकरणी फिल्टर प्लॅन्टच्या मालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ठाणे अमलदार एम.बी.जगधने यांच्याकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, घनसावंगी तालुक्यातील पारडगांव येथील दलित तरुण अनिल नितीन नाटकर हा त्याच्या परिवारासह दर्गा पराडा येथे राहत होता. व तो सय्यद अली अहेमद सय्यद अनिस यांच्या दर्गा पराडा येथील पाणी फिल्टर प्लॅन्टवर महिन्याने कामाला होता. अनिल नाटकर हा कामावर न गेल्याने पाणी फिल्टर प्लॅन्ट मालक सय्यद अली अहेमद सय्यद अनिस याने त्याच्या घरी जाऊन त्यास जातिवाचक शिवीगाळ केली. व बळजबरीने पाणी फिल्टर प्लॅन्टवर घेऊन गेला. तेथे हत्याराने त्याच्या डोक्यावर व हातावर मारहाण करून त्याची हत्या केली.

याप्रकरणी अंबड पोलीसात मयताचे वडील नितीन उत्तम नाटकर (रा.पारडगांव ता.घनसावंगी जि.जालना) यांच्या फिर्यादीवरून फिल्टर प्लॅन्ट मालक सय्यद अली अहेमद सय्यद अनिस (रा.दर्गा पराडा ता.अंबड जि.जालना) याच्या विरुद्ध कलम 302, 364 भादवीसह कलम 3 (2) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सि.डी.शेवगण हे करीत आहेत.