युवा संघर्ष यात्रेच्या समारोपावेळी नागपुरात सभा, शरद पवार, उद्धव ठाकरे, दिग्विजय सिंह राहणार उपस्थित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकरी, महिला सुरक्षा, रिक्त पदे, कंत्राटी नोकरभरती यासह सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांविरोधात सरकारला जाब विचारणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप मंगळवार, 12 डिसेंबरला नागपूरला होणार आहे. यावेळी दुपारी दोन वाजता झिरोमाईल येथे आयोजित करण्यात येणाऱ्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह मार्गदर्शन करणार आहेत.

शेतमालाला योग्य भाव द्या,  राज्यातील विविध खात्यातील रिक्त पदे त्वरित भरा, महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा लागू करा, पंत्राटी नोकरभरती,  जातनिहाय जनगणना करण्यात यावी या व इतर मागण्यासाठी राष्ट्रवादीने आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली युवा संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. सभेला शिवसेना नेते- खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहतील, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.