
तुफान फलंदाजी, तगडं क्षेत्ररक्षण, टिचून गोलंदाजी असा अष्टपैलू खेळ करणारा क्रिकेटपटू पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. 2007 मध्ये T20 वर्ल्ड कप आणि 2011 मध्ये वर्ल्ड कपच्या संघाचा जो भाग होता. हा डावखुरा फलंदाज युवराज सिंह पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी तयार आहे.
39 वर्षाच्या युवराज सिंह याने 10 जून 2019 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र आता त्याने पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याची घोषणा केली आहे. युवराजने म्हटले आहे की, तो पुढल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मैदानात उतरणार आहे. तसेच चाहत्यांनी कठीण काळात टीम इंडियाची साथ सोडू नये, असे आवाहनदेखील केले आहे.
युवराज सिंहने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर वर्ष 2017 मध्ये इंग्लंडच्या विरुद्ध जोरदार फलंदाजीचा व्हिडीओ जारी करत ही पुनरागमनाची घोषणा केली आहे. कटकमध्ये त्याने 150 धावा ठोकल्या होत्या, तर धोनीने 134 धावांची खेळी खेळली होती. कॅन्सरसारख्या आजारातून बाहेर पडलेल्या युवराज सिंहने कटकमध्ये 127 धावांमध्ये 21 चौकार तीन षटकारासह 150 धावा केल्या होत्या.
‘तुमचं नशीब भगवंत ठरवत असतो. चाहत्यांच्या मागणीमुळे मी फेब्रुवारीमध्ये पुन्हा मैदानात उतरणार आहे. तुमचं प्रेम आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. नेहमी पाठिंबा देत राहा. नेहमी पाठिंबा देत रहा. टीम इंडिया ही आपली टीम आहे आणि कठीण काळातही आपल्या टीमसोबत उभं राहणं हेच खऱ्या चाहत्याचं लक्षण आहे.’, असं युवाराजने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.


























































