हिंदू देवी देवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली, पाकिस्तानी अँकरची हकालपट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानी स्पोर्ट्स अँकर जैनब अब्बास हिची हिंदुस्थानातून हकालपट्टी झाली आहे. हिंदू देवदेवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे तिला ऐन विश्वचषकात हिंदुस्थानातून काढता पाय घ्यावा लागला आहे.

तिने 9 वर्षांपूर्वी एक ट्वीट केलं होतं. त्या ट्विटविरोधात विनित जिंदल या सर्वोच्च न्यायालयातील वकिलाने तक्रार दाखल केली होती. जैनब हिने सोशल मीडियावर हिंदू आणि हिंदुस्थानींचा अपमान केला असा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. जिंदल यांनी जैनबचे 9 वर्षांपूर्वीचे दोन ट्वीट शेअर केले होते. ते तिच्या अधिकृत हँडलवरून केले गेले होते.

ते ट्वीट शेअर करून जिंदल यांनी बीसीसीआय आणि गृह मंत्रालयाकडे लेखी तक्रार केली. आपल्या देशाची संस्कृती अतिथी देवो भव अशी असली तरी जो हिंदू धर्म आणि देशाचा अवमान करेल त्यांचं आमच्या देशात स्वागत होऊ नये, असं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं. त्यानंतर जैनब हिने सुरक्षेच्या कारणास्तव हिंदुस्थानातून काढता पाय घेतल्याचं वृत्त समा टीव्ही या पाकिस्तानी वृत्तवाहिनीने प्रसारित केलं आहे.