झाकीर नाईकला केंद्रीय गृह मंत्रालयाचा दणका; ‘आयआरएफ’वरील बंदी आणखी पाच वर्षांनी वाढवली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वादग्रस्त आणि चिथावणीखोर भाषणं करून दहशतवादाला खतपाणी घालणाऱया कथित इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकला केंद्रीय गृह मंत्रालयाने दणका दिला आहे. झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनवरील (आयआरएफ) बंदी केंद्रीय गृह मंत्रालयाने आणखी पाच वर्षांसाठी वाढवली आहे. यापूर्वी या संघटनेवर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) अंतर्गत 17 नोव्हेंबर 2016मध्ये बंदी घालण्यात आली होती.

केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत म्हटलेय, देशाच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचेल अशा कृतींमध्ये ‘आयआरएफ’ ही संघटना सहभागी आहे. ही संघटना देशाच्या धर्मनिरपेक्षतेला धक्का लावू शकते. केंद्रीय गृह मंत्रालयाने पुढे म्हटलेय, आयआरएफचा संस्थापक आणि प्रमुख झाकीर नाईकची भाषणं वादग्रस्त आणि चिथावणीखोर आहेत. झाकीर नाईक मलेशियामधून इंटरनेट, सॅटेलाईट टीव्ही, प्रिंट तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील लाखो लोकांसमोर प्रक्षोभक भाषणे करतो. देशातील विशिष्ट भागात धार्मिक द्वेष पसरवून तरुणांना दहशतवादी कृत्यांमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहन देतो. या संघटनेवर वेळीच बंदी घातली नाही तर देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण होईल. त्यामुळे ‘यूएपीए’ अंतर्गत पाच वर्षांची बंदी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.