
>> रोहिणी निनावे
श्रीरंग गोडबोले. खऱ्या अर्थाने चतुरस्र वल्ली. उत्तम लेखक… कवी… निर्माते… दिग्दर्शक आणि बरेच काही!
सध्या ‘इडियट्स’ हे नाटक चांगलंच गाजतं आहे. या नाटकाचे लेखक दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांचं नाव सगळ्यांनी आधीही खूपदा ऐकलं, पाहिलं असेल. उत्तम लेखक, उत्तम कवी आणि प्रयोगशील दिग्दर्शक असलेल्या श्रीरंग गोडबोले यांची मुलाखत घ्यायला मी त्यांच्या वांद्रे येथील ऑफिसमध्ये पोहोचले. त्यांचं काम चालूच होतं. मग काम थांबवून ते माझ्याशी बोलायला लागले. म्हणाले, मी बोलत जातो. त्यात तुला काही उत्तरं मिळाली तर बघ…अर्थातच या क्षेत्राविषयी गोडी कशी निर्माण झाली या प्रश्नापासूनच मुलाखतीला सुरुवात झाली.
गोडबोलेंनी सांगितलं की, मुळात त्यांचा जन्म पुण्याचा आहे, त्यांनी एसएससीपर्यंतचं शिक्षण पुण्यात घेतलं. कॉलेज रुईया, झेविअर्समध्ये केलं आणि नंतर इंजिनीअरिंग केलं. तेव्हापासून माझा पुणे-मुंबई-पुणे असा तळ्यात मळ्यात प्रवास चालू आहे .मी स्वतःला पुण्यवान समजतो की, माझी जडणघडण पुण्यासारख्या संस्कृती आणि कलेच्या माहेरघरात झाली. माझ्या या प्रवासाचा पाया एक प्रकारे वडिलांनीच रचला. आमच्या बंगल्याच्या आऊट हाऊसमध्ये माझ्या वडिलांनी एक लायब्ररी सुरू केली होती. त्यामुळे मला खूप पुस्तकं वाचायला मिळाली. मी पुस्तकी किडाच झालो होतो म्हण ना…! त्यानंतर नूतन महाविद्यालयाच्या लायब्ररीमध्येही माझी अमाप पुस्तकांशी भेट झाली. तिथे पुस्तकांची एक पेटी असायची. मग मी एक एक करून आंब्याची पेटी जशी आधाशाने आणि आवडीने संपवतो तशी फस्त केली. याच काळात इंग्लिश पुस्तकं वाचण्याचा छंद मला लागला, इंग्लिश वाचण्याचा माझा स्पीडही वाढला. मी गाणंही शिकलो आहे त्यामुळे छंद आणि वृत्ताचा माझा चांगला अभ्यास होता. माझे गिरगावात राहणारे एक आजोबा स्वान्तसुखाय कविता लिहायचे. मी त्यांना त्या मीटरमध्ये बसवून द्यायचो.
कविता करण्यासाठी पोषक असं वातावरण घरात होतं. वडिलांचं प्रोत्साहन होतं. परंतु आठवीनंतर कवितेच्या जागी वात्रटिका लिहू लागलो. व्यायामशाळेमध्ये गेल्यावर प्रेमकविता लिहिणं म्हणजे बायलेपणाचं लक्षण असं समजलं जात असल्याने आणि त्याच काळात सामाजिक जाणिवेची सुरुवात झाल्याने, त्या तऱहेच्या कविता लिहायला लागलो. तेव्हा महाराष्ट्र टाइम्ससाठी विजय तेंडुलकर काही कवितांची निवड करत, त्यात माझ्या कविता त्यांनी निवडल्यावर मग मला वाटायला लागलं की, मी काहीतरी बरं लिहीत असेन. त्यानंतर विचारसरणीही बदलत गेली. विद्यार्थी चळवळीत भाग घेतला. विंदा तर आवडायचेच, पण मग विद्रोही साहित्यही वाचायला लागलो. ढसाळ, नेमाडे वगैरे. मध्यमवर्गीय मराठी घरात जन्म घेतला असल्याने इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण करावंच लागलं.
माझा नाटकाकडे ओढा वाढला. मी गायचो, पथनाटय़ करायचो. माझ्या दिग्दर्शकीय कारकिर्दीची खरी सुरुवात झाली ती मी 26 वर्षांचा असताना. ‘रंगमंचावर वावरतानाचे कलाकार आणि ग्रीनरूममध्ये वावरतानाचे कलाकार आणि त्यांचे संबंध’ या विषयावर ते नाटक होतं. आधी माझी ही कल्पना कुणाला पटली नाही. मग ठरवलं, आपणच नाटक लिहायचं आणि मी ते नाटक लिहिलं. या नाटकाला राज्य नाटय़ स्पर्धेत सगळी बक्षिसं मिळाली. हे नाटक गाजल्यावर माझ्यामध्ये एक विश्वास आला.
पुण्याच्या ग्रिप्स थिएटरला मी जॉइन झालो. मोहन आगाशेंच्या सांगण्यावरून मी बालनाटय़ं लिहिली, तीदेखील गाजली. मी रेल्वेमध्ये प्रोजेक्ट इंजिनीअरचं काम करत असल्यामुळे, एखादी गोष्ट कशी तडीस न्यायची, हे कळलं. तिथे वापरत असेलला नेतृत्वगुण इथेही कामाला आला. मग माझा एक मोठा ग्रूप तयार झाला. आम्ही नवनवीन नाटकं करायचो, शिबिरं करायचो. विद्यार्थी संघटनेमध्ये काम केलं असल्याने माणसं जोडण्याचा गुण उपयोगी ठरला. एक उत्तम दिग्दर्शक होण्यासाठी या गुणांची आवश्यकता असते. त्या सुमारास टेलिव्हिजनवर सीरिअल्स जोरात सुरू झाल्या होत्या. तेव्हा तीनच वाहिन्या होत्या. अल्फा मराठी, ई मराठी आणि प्रभात याच खासगी वाहिन्या होत्या. अजय सरपोतदार यांनी माझं काम पाहिलेलं असल्याने त्यांनी मला सीरियल बनवण्याचं काम दिलं. यानंतर इव्हेंट्स डिरेक्ट करायची संधी मिळाली. अनुभव नव्हता, पण चॅलेंजेस घेत गेलो, पुढचं पाऊल टाकलं सिनेमामध्ये चिंटू 1, चिंटू 2, मंगल पांडे, पितृऋण… नंतर हरिश्चंद्राची फॅक्टरी हा सिनेमा एक्झिक्युटिव्ह प्रोडय़ुसर म्हणून केला.
मी म्हटलं, तुमची गाणी, टायटल साँग खूपच लोकप्रिय झाली आहेत. ते म्हणाले, सोपी भावपूर्ण गाणी लिहितो, त्यातलं शब्दसौंदर्य जपून . श्रीरंग गोडबोलेंची गाणी सांगितली तर थक्क व्हाल …सा रे ग म प.. एकापेक्षा एक .. घडलंय बिघडलंय .. तुझ्यात जीव रंगला, लख लख चंदेरी, अग्निहोत्र.
मी विचारलं, बदलत्या काळाबरोबर मीडियामध्ये काय बदल झाले आहेत? ते म्हणाले, जे काही बदल झाले आहेत ते सकारात्मक… कुठलाही काळ सुवर्णकाळच असतो. कारण बदलत्या विज्ञानाप्रमाणे, विचारसरणीमुळे सकारात्मक बदलच होत असतो. प्रेक्षकांनी तो स्वीकारायला हवा. काही प्रेक्षक चोखंदळ रसिक असतात, मात्र काही प्रेक्षक उगाच मालिकांना बोल लावत असतात. मुळात त्यांना मराठीबद्दल किती आस्था आहे? मला तर मराठी भाषा बोलण्याचादेखील आनंद वाटतो, पण प्रेक्षक मात्र मराठी वाचताना दिसत नाहीत. मराठी चित्रपट नाटकं बघायला गर्दी करत नाहीत… मोजकी नाटकं सोडल्यास मराठी नाटकांना गर्दी नसते. हे चित्र अधिक सकारात्मक होण्यासाठी प्रेक्षकांच्या प्रतिसादाची गरज असते आणि नसेल तर साहित्य, संस्कृतीला नावे ठेवण्याचा तुम्हाला काही हक्क नाही असं माझं मत आहे.
मी विचारलं, आपण स्वतः काय बदल करू शकतो आपल्या कामात? कारण सध्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत खासगी वाहिन्यांवर. ते म्हणाले, आपण प्रयोगशील असायला हवं. नवनवीन चॅनल्स येत आहेत. त्यात आपलं वेगळेपण जपायला हवं. चॅलेंजेस घ्यायला हवीत. फ्रेश कल्पना मांडायला हव्यात. मघाशी जे म्हणालो तेच. प्रेक्षकांनी त्या स्वीकारायला हव्यात. जुन्याला चिकटून संस्कृती, संस्कृती म्हणून ओरड करू नये. नेहमी टीकेचा झेंडा घेऊन बसू नये. सतत अस्मिता अस्मिता करत बसणे, एवढय़ा तेवढय़ाने भावना दुखावणे चुकीचे आहे. प्रेक्षकांच्या नकारात्मक भूमिकेमुळे लेखक, दिग्दर्शक नाउमेद होतात आणि दुसरी स्पेस शोधू लागतात.
शिवाय आपल्या क्षेत्रातल्या लोकांनीसुद्धा आता काय नवीन असं विचारत बसू नये. आधी विचारायचं नाटक कधी? मग विचारायचं फिल्म कधी? नंतर विचारायचं हिंदीमध्ये कधी? ज्या गोष्टी जेव्हा घडायच्या तेव्हा घडणार आहेत. मी विचारलं, अवॉर्ड्सविषयी तुमचं काय मत आहे? ते म्हणाले अवॉर्ड्सना फार सीरिअसली घेऊ नये. टेलिव्हिजनमध्ये तर नाहीच नाही. ती एक तात्कालिक प्रक्रिया असते. देणाऱयाने देत जावे, घेणाऱयाने घेत जावे आणि मग दोघांनी विसरून जावे.
मी म्हटलं, तुमची मतं ठाम आहेत. हा ठामपणा माणसाला एखादी कलाकृती मांडताना नेहमी कामाला येतो नाही? आणि हो, आणखी एक गोष्ट, या क्षेत्रातल्या लोकांना पूरक ठरते, ती म्हणजे घरच्यांचं प्रोत्साहन. तुमची पत्नी गीता गोडबोले यांचाही तुमच्या यशामध्ये सहभाग आहे. श्रीरंग म्हणाले हो. आणि तीदेखील या क्षेत्रातलीच असल्याने इथे काम कसं चालतं याची तिला कल्पना आहे. श्रीरंग म्हणाले, आमचं सगळं घरच या क्षेत्रात आहे. माझा मुलगा सुहृद निर्माता बनला आहे. मुलगी मृण्मयी आणि सून गिरिजा ओक गोडबोले या अभिनेत्री आहेत. श्रीरंग गोडबोलेंचा निरोप घेताना मला वाटलं, आपल्या क्षेत्रातलं हे एक यशस्वी, सुखी आणि गोड कुटुंब आहे. या कुटुंबाच्या सुखाचं दिग्दर्शन करणाऱया श्रीरंग गोडबोलेंचं आणखी काम रसिक प्रेक्षकांना बघायला मिळू दे…!




























































