
सामना ऑनलाईन, ठाणे
ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि लेखक पद्मश्री मुजफ्फर हुसैन यांचे अल्पश: आजारामुळे मंगळवारी निधन झाले. त्यांचे वय ७८ वर्षे होते. डायलिसीस उपचारांसाठी त्यांना पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती आज सायंकाळी अचानक खालावली आणि ७.२०च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी नफिसा, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
मुजफ्फर हुसैन यांचा जन्म २० मार्च १९४० रोजी झाला होता. ते एक कट्टर राष्ट्रवादी मुस्लीम आणि लढवय्ये पत्रकार होते. सामाजिक चळवळीतही त्यांचे योगदान होते. इस्लाममधील तलाकसारख्या जाचक प्रथा-परंपरांवर त्यांनी आपल्या लेखनातून निर्भिडपणे आसूड ओढले. हिंदुत्ववादी विचारसरणीचाही ते अत्यंत आदर करायचे. दैनिक ‘सामना’त त्यांनी १२ वर्षे ‘पडसाद’ या स्तंभातून लेखन केले. हिंदी ‘सामना’तही त्यांनी लेखन केले. ते एक उत्तम वक्तेही होते.
मुजफ्फर हुसैन एक व्यासंगी पत्रकार होते. दहशतवाद, मुस्लीम राष्ट्रांमधील घडामोडी यावर त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके गाजली. इस्लाम व शाकाहार, मुस्लीम मानसशास्त्र, दंगों में झुलसी मुंबई, अल्पसंख्याक वाद- एक धोका, इस्लाम धर्मातील कुटुंब नियोजन, लादेन, दहशतवाद आणि अफगाणिस्तान, समान नागरी कायदा ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही हुसैन यांचा जवळचा संबंध होता.
ऊर्दू भाषेला प्रोत्साहन देणाऱया नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ ऊर्दू लँग्वेजच्या (एनसीपीयूएल) उपाध्यक्ष पदाची जबाबदारी डिसेंबर २०१४पासून हुसैन यांच्याकडे होती. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला होता. हुसैन यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी विक्रोळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.































































