तपस्वी अभ्यासक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. राहुल अशोक पाटील

लोकसाहित्याच्या क्षेत्रात समर्पण भावनेने संशोधन आणि अभ्यास करणाऱया तपस्वींच्या नावापुढे काही बिरुदं जरूर लागतात. मात्र आर्थिक आणि इतर बाबतीत वानवाच असते. तरीही एका क्रतस्थपणे आणि ध्यानस्थ पद्धतीने काही तपस्वी आपले आयुष्य त्यासाठी वेचतात. अण्णा ऊर्फ रामचंद्र चिंतामण ढेरे हे त्यापैकीच एक. त्यांचे आज पुण्यस्मरण. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती या क्षेत्रातील त्यांचे कार्य सामान्य वाचक आणि अभ्यासकांसाठी दीपस्तंभासारखेच आहे.

आज ज्यासाठी पगार मिळतो ते काम प्रामाणिकपणे करणाऱयांची संख्या दिवसेंदिवस झपाटय़ाने कमी होते आहे. त्यात जर कुणी सांगितले की प्रचंड प्रतिकूलतेतून पीएच.डी.पर्यंत शिकल्यावर स्थैर्य देणारी चांगल्या पगाराची नोकरी नाकारून आवडीच्या क्षेत्रात रमलेली, ध्येयनिष्ठा ठेवून ध्यानस्थ पद्धतीने अखेरच्या श्वासापर्यंत काम करत राहिलेली व्यक्ती आम्ही पाहिली तर आपल्यापैकी अनेकांचा विश्वास बसणार नाही. पण ही गोष्ट खरी करून दाखवली ती साहित्यक्षेत्रातील अण्णा तथा रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी! आयुष्यभरात विविध विषयांवर १०५ पुस्तकांचे लेखन, ५० हजार गंथांचे स्वतःचे सुसज्ज ग्रंथालय, संशोधनाच्या निमित्ताने लाखो किलोमीटरचा प्रवास, स्वतःचे अखंड वाचन, हजारो सर्वसामान्यांना वाचनासाठी प्रेरणा आणि शेकडो अभ्यासकांना संशोधनासाठी मार्गदर्शन हे या तपस्वी अभ्यासकाचे ठळक योगदान…

काही क्षेत्रांत थोडे काम केले तरी डोक्यावर घेऊन मिरवले जाते पण साहित्यासारख्या क्षेत्रात आयुष्यभर झटल्यावर नावापुढे काही बिरुदं सोडली तर अशा समर्पित तपस्वींच्या हाती फारसं काही लागत नाही याची जाणीव असूनही समीक्षा-संशोधन आणि लोकसाहित्यात समर्पण वृत्तीने रा. चिं. ढेरे सरांनी अविरत काम केले. विविध शारीरिक व्याधींवर मात करत त्यांनी संशोधनासाठी आयुष्यभर अविरत भटकंती केली. समाजाच्या श्रद्धा, आस्था, दैवते यावर संशोधन आणि वस्तुनिष्ठ लेखन करणे (विशेषतः आपल्याकडे) किती आव्हानात्मक आहे याची आपणा सर्वांना जाणीव आहेच. अशा विषयांवर आयुष्यभर भरपूर वाचन, चिंतन, मनन आणि लेखन त्यांनी केले. हिंदुस्थानभ्रमण करत असंख्य हस्तलिखिते, दुर्मिळ पोथ्या, संदर्भग्रंथ त्यांनी आयुष्यभरात जमा केले. वयाच्या 86 व्या वर्षी निधनापूर्वी त्यांच्या ग्रंथालयात साधारण ५० हजार पुस्तके होती.

वयाच्या पाचव्या वर्षी आईवडील वारल्याने बालपण प्रतिकूलतेत गेले. शिक्षणाच्या निमित्ताने ते पुण्यात आले. भक्कम आधार किंवा आर्थिक मिळकत नसताना रस्त्यावरील पुस्तके, रद्दी आणि पुस्तकांच्या दुकानांतून त्यांनी चार हजार पुस्तके जमवली. नदीकाठी ओल असलेल्या घरात ते राहिले, पण अभ्यास-वाचन यात खंड पडू दिला नाही. दुर्दैवाने पाणशेतच्या पुरात ते सारे वाहून गेले, मात्र हिंमत न हरता त्यांनी पुन्हा कंबर कसली. मिळतील ती कामे करून उपजीविका चालविली आणि पुन्हा गंथभांडार उभे केले. वाचन-लेखन केले. उमेदीच्या काळात नाथसंप्रदाय, प्राच्यविद्या यातील संशोधनामुळे त्यांचे आयुष्य बदलले. प्राचीन साहित्य, लोकसंस्कृती, लोकदैवते, लोकसाहित्य, धार्मिक, संतविषयक चरित्रे आणि संशोधन या क्षेत्रांमधील दुर्लक्षित विषय शोधत त्यांनी सातत्यपूर्ण व सकस लेखन केले. विनम्र व मितभाषी स्वभाव, व्यासंग व संशोधनमग्नता ही त्यांची वैशिष्टय़े होती. संशोधनाचे प्राथमिक धडेही गिरविले नसताना केवळ स्वयंशिस्त, चिकाटी आणि मेहनतीने त्यांनी स्वतःसाठी आणि पर्यायाने अभ्यासकांसाठी नवी वाट निर्माण केली. याच वाटेने ते निरलसपणे, निःस्वार्थीपणे आयुष्यभर चालत राहिले. अनेक संतांच्या कथा व चरित्रकथाही त्यांनी लिहिल्या. अण्णांचे कोणतेच लेखन वरवरचे किंवा वर्णनात्मक नव्हते. हजारो-लाखो कागदपत्रे शोधून, ती मुळातून वाचून त्यातील संदर्भ समजावून घेत सत्य पडताळून त्यांनी ही मांडणी केली.

पीएच.डी. मिळाल्यावर त्यांना प्राध्यापकाची नोकरी सहज मिळत होती, पण नोकरीत अडकून पडण्यापेक्षा संशोधन मार्गावरून चालायचे त्यांनी ठरविले. ते हाडाचे शिक्षक होते. अनेकांसाठी त्यांनी आपली वैयक्तिक आणि कष्टाने मिळविलेली ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिली. अनेकांना वाचण्यासाठी-लिहिण्यासाठी ते सातत्याने प्रोत्साहन व मार्गदर्शनही देत राहिले. त्यांच्याकडे पुस्तके वाचण्यासाठी येणारे काही जण आले नाही तर अण्णा स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना पुस्तके देत आणि वाचनात खंड पडू देऊ नका, सातत्य ठेवा असे आवर्जून सांगत. माणुसकीची किनार लाभलेले अण्णा स्वतः व्यासपीठावर फारच क्वचित दिसत.

कन्नड साहित्यिक कलबुर्गी यांचे अण्णांवर विशेष प्रेम होते. अण्णांच्या सहा पुस्तकांचे अनुवादही त्यांनी कन्नडमध्ये करवून घेतले. उतारवयात कन्या अरुणाताईंना समवेत घेऊन अण्णा नरसिंहावरील माहिती संकलनासाठी जेव्हा हंपी येथे गेले तेव्हा एकाही स्नेहय़ाला त्यांनी तिथे गेल्याचे कळू दिले नाही. कारण आपण आल्याचे त्यांना कळाले तर ते हातातील कामे सोडून येतील. आपल्यामुळे इतरांना होणारा त्रास त्यांना नको होता. कौटुंबिक पार्श्वभूमी, भक्कम आधार किंवा मार्गदर्शन नसताना एखादी व्यक्ती जेव्हा या दर्जाचे काम करते तेव्हा निश्चितच ‘आपला माणूस’ म्हणून ती अभ्यासकांच्या कौतुकास पात्र ठरते. पण अशा प्रेरणादायी, दीपस्तंभ व्यक्ती दुर्मिळ असतात म्हणून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपणही वाटचाल करायला हवी.

( लेखक समीक्षक व संशोधक आहेत.)