बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मिळाली 362 चौ.मी. वाढीव जागा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

शिवाजी पार्क महापौर बंगला येथे होणाऱया हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकासाठी आणखी 362.04 चौरस मीटर वाढीव जागा मिळणार आहे. त्यामुळे आता एकूण 11913.05 चौरस मीटर जागेवर ही भव्य वास्तू उभारली जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला मंगळवारी सुधार समितीत मंजुरी मिळाली.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा झंझावाती जीवनप्रवास बाळासाहेब ठाकरे स्मारकात उलगडला जाणार आहे. शासनाने महापौर बंगला व परिसरात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यताही दिलेली आहे, मात्र या ठिकाणच्या 362.04 चौरस मीटर जागेबाबत केरलिया महिला समाज विरुद्ध मुंबई महानगरपालिका यांच्यात उच्च न्यायालयात दावा सुरू होता. हा दावा निकाली निघाल्याचे पालिका प्रशासनाने सुधार समितीत स्पष्ट केले. याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीत मांडल्यानंतर हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाल्याचे सुधार समिती अध्यक्ष सदा परब यांनी जाहीर केले. भव्य स्मारकाच्या उभारणीसाठी महापौर बंगल्याची जमीन स्मारक संस्थेला देण्याबाबत मुंबई महापालिका आणि बाळासाहेब ठाकरे स्मारक विश्वस्त संस्थेदरम्यान महत्वपूर्ण करारही अलीकडेच झाला आहे. यातच आता वाढीव जागाही मिळाल्याने स्मारक  उभारणीच्या कामाला गती मिळणार आहे.

असे होणार भव्य स्मारक

 स्मारकासाठी 11551.01 चौरस मीटर जागा बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाकडे  नोव्हेंबर 2018 मध्ये हस्तांतरित करण्यात आली आहे. आता वाढीव 362.04 चौ.मी. जागा मिळाल्याने स्मारकासाठी एकूण 11913.05 जागा उपलब्ध होणार आहे. या स्मारकासाठी पर्यावरण विभागासह सर्व विभागांच्या परवानग्या याधीच मिळाल्या आहेत.

 महापौर बंगल्याच्या ऐतिहासिक वास्तूला धक्का  न लावता या परिसरातील जमिनीखाली बाळासाहेबांचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे. महापौर बंगला येथील 362.04 चौरस मीटर जागा ‘केरलिया महिला समाज’ या संस्थेला भाडेपट्टय़ाने देण्यात आली होती. ही जागा स्मारकासाठी मिळाल्यामुळे केरलिया महिला समाजाला पर्यायी जागा दिली जाणार आहे.