
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
भरघोस आश्वासने देणाऱया मोदी सरकारला हिंदुस्थानी कंटाळल्याचे चित्र समोर आले आहे. सरकारवर अविश्वास दाखवत गेल्या वर्षभरात तब्बल 1 कोटी 70 लाख लोकांनी देश सोडल्याचे आशियाई विकास बँकेच्या अहवालातून उघड झाले आहे. मेक इन इंडिया तसेच देश प्रगतीच्या दिशेने वेगाने पुढे सरकत असल्याचे जरी सरकार म्हणत असले तरीही मोठय़ा संख्येने हिंदुस्थानींनी परदेशाचा रस्ता धरणे पसंत केल्याचे अहवालात म्हटले आहे.
हिंदुस्थानात सुरक्षितता आणि भविष्य राहिले नसल्याचे मोठय़ा संख्येने हिंदुस्थानींचे म्हणणे आहे. इथल्यापेक्षा परदेशात चांगल्या संधी उपलब्ध असून या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक संस्था पुढे येत आहेत. वर्क परमिट घेऊन दुबई, सौदी अरेबिया तसेच अमेरिका या ठिकाणी जाणाऱयांची संख्या मोठी आहे.
आश्वासनांची शवासने
– शेतकऱयांना उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर, प्रत्येक तरुणाला रोजगार, महिलांना सुरक्षा, भ्रष्टाचार संपवणार, शिक्षण आणि आरोग्य सुविधांमध्ये वाढ असे मोठे वायदे सरकारने गेल्या निवडणुकीच्या वेळी दिले होते, पण ही आश्वासने हवेतच विरली.
– स्वच्छ भारत अभियान, मेक इन इंडिया, पीक विमा योजना यांनाही अपेक्षित असे यश मिळालेले नाही.
– भाजपने दिलेल्या आश्वासनांची केवळ 28.46 टक्के पूर्तता झाल्याचे नीतिमत्ता आश्वासन केंद्राने यापूर्वीच आपल्या अभ्यासात म्हटले असून सरकार चार वर्षांत नापास झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
देशाला कुठल्या चिंतांनी ग्रासले…
आजच्या घडीला देशाला बेरोजगारीच्या मोठय़ा चिंतेने ग्रासल्याचे स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी (सीएसडीएस)-लोकनीती या संस्थेच्या अहवालात याआधीच स्पष्ट करण्यात आले आहे. नोकरीच्या संधी गेल्या तीन वर्षांत कमी झाल्या असून शेतकऱयांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. देशात महाराष्ट्रसह अनेक राज्यांमध्ये दुष्काळ आहे.



























































