
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’च्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन गगनयान’ प्रकल्पासाठी मंजुरी देतानाच केंद्र सरकारने 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यास मान्यता दिली आहे. 3 हिंदुस्थानी अंतराळवीर 7 दिवस अवकाशात मुक्काम ठोकणार असून 2022पर्यंत ‘गगनयान’ मोहीम पूर्ण होणार आहे.
‘गगनयान’ मोहीम यशस्वी झाल्यास मानवाला अंतराळात पाठविणारा हिंदुस्थान हा जगातील चौथा देश ठरणार आहे. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
– येत्या 40 दिवसांत ‘गगनयान मिशन’ मोहिमेला सुरुवात होईल. या महत्त्वाकांक्षी मिशनसाठी रशिया आणि फ्रान्सबरोबर करार केला आहे.
– 2022पर्यंत हे मिशन पूर्ण होईल. त्याआधी 2020 आणि 2021मध्ये मानवरहित यानही अवकाशात पाठविण्यात येईल.
– या मिशनची जबाबदारी एका महिलेच्या हाती देण्यात येणार आहे. ‘इस्रो’च्या डॉ. व्ही.आर. ललिथंबिका यांच्याकडे नेतृत्व असणार आहे. त्या कंट्रोल रॉकेट इंजिनीअर आहेत. त्या गेली 30 वर्षांपासून ‘इस्त्राs’मध्ये काम करीत आहेत.

























































