
जिंकण्याची जिद्द मनात बाळगली तर त्याला वयाचा काही प्रश्न येत नाही. हरियाणातील एका वृद्ध महिलेच्या बाबतीत देखील असेच काहीसे घडले आहे. वयाच्या 107 व्या वर्षी एका महिलेने दोन सुवर्णपदके जिंकली आहेत.
हरियाणातील चरखी दादरी, येथे उदयनपरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या आजी रामबाई सध्या हैदराबादच्या मैदातानात धुमाकूळ घालत आहेत. रामबाई या धावपटू असून हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत हरियाणाचे प्रतिनिधित्व करून 2 सुवर्णपदकेही जिंकली आहेत. त्याचबरोबर रामबाईंची 65 वर्षांची मुलगी संतरादेवी यांनी देखील तीन पदके पटकावली आहेत.
पाचवी राष्ट्रीय मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पिअनशिप 8 ते 11 फेब्रुवारी या दरम्यान हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये देशातील विविध राज्यातील खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत चरखी दादरी जिल्ह्यातील कदम गावच्या रहिवासी असलेल्या 107 वर्षीय धावपटू रामबाई यांनी 105 वर्षांवरील वयोगटामध्ये हरियाणाचे प्रतिनिधित्व करत डिस्कस थ्रो आणि शॉटपुटमध्ये प्रथम क्रमांक पटकावत 2 सुवर्ण पदके जिंकली.
1500 मीटर शर्यतीत रौप्य पदक
रामबाई यांची धाकटी कन्या 65 वर्षीय संतरादेवी यांनी देखील 1500 मीटर शर्यतीत रौप्यपदक पटकावले आहे. तसेच शॉटपुट या प्रकारात कांस्य पदक आणि 5 किलोमीटर चालण्यात रौप्यपदक मिळवले आहे. 11 फेब्रुवारी रोजी रामबाई 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेणार आहेत.
उदयनपरी दादरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या रामबाई यांची नात शर्मिला सांगवानच्या मते, अलीकडेच रामबाई यांनी 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी राजस्थानमधील अलवर येथे झालेल्या खुल्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत यशाचा झेंडा रोवला. या स्पर्धेत त्यांनी 100 मीटर शर्यत, शॉटपुट आणि डिस्क थ्रोमध्ये तीन सुवर्ण पदके पटकावली.




























































