
सामना प्रतिनिधी । शिरोळ
धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा दुथडी भरून वहात आहेत. यामुळे शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथे कृष्णा नदीतून आलेली ११ फुटी मगर थेट लोकवस्तीमध्ये घुसली. मध्यरात्री घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. मात्र, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन व रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी नागरिकांना मदतीने या मगरीला जेरबंद केले.
संततधार पावसामुळे सैनिक टाकळी येथे कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीपात्रातून मध्यरात्री ११ फुटी मगर शेजारी असणाऱ्या वस्तीमध्ये शिरली. ग्रामस्थ मनोहर पाटील यांना घरामागे मगर असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने आसपासच्या लोकांना याची माहिती दिली. ग्रामस्थांनी जयसिंगपूर येथील वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन आणि रेस्क्यू फोर्सच्या जवानांना माहिती दिली. त्यानंतर जवानांनी तातडीने सैनिक टाकळी येथे धाव घेऊन नागरिकांना मदतीने ही मगर जेरबंद केली. मगर पकडताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

घटनास्थळी मंडल अधिकारी विनायक माने, तलाठी एम. एन. जाधव, कोतवाल संजय कोळी यांच्यासह जवान संघमेश्वर येळ्ळूर, नितेश वनकोरे, निलेश वनकोरे, ओंकार पाटील, अक्षय पाटील, अमर पाटील, गजानन सुतार, फॉरेस्ट अधिकारी एस. एन. पवार आदी उपास्थित होते.

























































