घरात सापडले कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह,राजधानी दिल्ली हादरली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

येथील एका व्यापाऱयाच्या घरात आज सकाळी ११ जणांचे मृतदेह सापडल्याने राजधानी नवी दिल्ली हादरली आहे. यामधील नऊ मृतदेहांच्या डोळय़ांवर पट्टय़ा बांधून ते घरात ग्रिलिंगच्या सिलिंगला लटकून दिले होते. या हत्याकांडामागे घरातील एकजण असण्याची शक्यता आहे. त्यानेच काल रात्री १० जणांना जेवणातून विष देऊन हत्या केली नंतर त्याने आत्महत्या केली असा संशय आहे.

प्रथमतः हा सामूहिक आत्महत्येचा संशय होता. परंतु घरातील रात्रीच्या जेवणातील पदार्थांत विषारी पदार्थ सापडल्याने आता हे सामूहिक हत्याकांड असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मृतांत ७५ वर्षीय वृद्ध महिला नारायण भाटिया, मुले ललित, भूपी, विधवा मुलगी प्रतिभा (५५), सुना सविता, टीना, नाती नितू, मिनू, प्रियांका, नातू – धृव (१२), शिवम यांचा समावेश आहे.

या हत्याकांडात नष्ट झालेले भाटिया कुटुंबीय हे मूळचे राजस्थानचे असून त्यांचे येथे बुराडीतील संतनगरात तीन मजली इमारतीत तळमजल्यावर किराणा माल आणि प्लायवुडची दुकाने आहेत. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली आहे. रोज सकाळी सहाला त्यांचे किराणा मालाचे दुकान उघडते. आज हे दुकान ७.३० वाजले तरी उघडले नाही तेव्हा एकाने घरात डोकावून पाहिले तर त्याला घरात एका ग्रिलिंगला मृतदेह टांगलेल्या अवस्थेत दिसला. यानंतर ही माहिती पोलिसांना दिली. हे वृत्त सकाळी ऐकून राजधानी दिल्ली हादरली.

पोलीस तपास काय सांगतो?

पोलिसांनी या दुकानाच्या जवळचे सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असून त्यात रात्री उशिरा भाटिया यांच्या घरातून कोणीही बाहेर येताना किंवा घरात जाताना दिसत नाही. तसेच नेहमी घरात झोपणाऱया कुत्र्याला माळय़ावर नेऊन बांधले. मृतदेहांना लटकविताना तो भुंकू नये हा यामागे हेतू असावा. तसेच मृतदेहांचे हातपाय बांधणे, त्यांच्या तोंडांना डोळय़ांना पट्टय़ा बांधणे यामागे फासावर लटकविलेल्या व्यक्ती शुद्धीवर आल्या तर त्यांनी आरडाओरड करू नये हा असावा. यामुळे या घरातील कोणीतरी एकाने सर्वांना अन्नातून विष दिले असावे. नंतर आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलीस तपासात व्यक्त केला जात आहे.