
सामना प्रतिनिधी । पारनेर
तालुक्यातील राळेगणथेरपाळ येथे चार वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचारा पाठोपाठ तीन दिवसांपूर्वी याचा गावातून बेपत्ता झालेल्या दिव्या हनुमंत कारखिले या 11 वर्षीय चिमुरडीचा मृतदेह विहीरीत आढळून आल्याचे खळबळ उडाली आहे. दिव्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करून आरोपीस अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला असून गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकारामुळे तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे.
शाळेला सुटी असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावीच्या वर्गात शिकणारी दिव्या ही घरीच अभ्यास करीत होती. तिची आई घरामागील शेतात काम करत होती, तर वडील मजुरीसाठी गेलेले हाते. घरात दिव्यासह तिचा 9 वीमध्ये शिकणारा भाऊही अभ्यास करीत होता. अभ्यास करीत असताना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दिव्या घराबाहेर निघून गेली. ती परतलीच नाही. सायंकाळी तिचे आई वडील घरी आल्यानंतर ती बेपत्ता झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. शोध घेऊनही ती न सापडल्या तिच्या वडिलांनी पारनेर पोलिसांकडे दिव्याचे अपहरण झाल्याची तक्रार दिली.
दरम्यान, या परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने बिबटयाने तर तिला उचलून नेले नसावे ना असा संशय घेण्यात येऊ लागला. त्यामुळे वनविभागाचे अधिकारी दिव्याचा शोध घेत होते. तर पोलिसांनी राळेगणथेरपाळ पंचक्रोशी दिव्याच्या शोधासाठी पिंजून काढली होती. दोन दिवसांत दिव्याचा शोध न लागू शकल्याने संतप्त नागरीकांनी सोमवारी गाव बंदचे अवाहन केले होते. सकाळी चौकामध्ये निषेध सभा सुरू असतानाच दिव्याचा मृतदेह तिच्या घरापासून सुमारे पाचशे मिटर अंतरावर असेलल्या शिवाजी बाजीराव कारखिले यांच्या ऊसाच्या फडामधील विहिरीमध्ये आढळून आला. यानंतर नगरचे न्यायवैद्यक पथक तसेच श्वानपथकास घटनास्थळी पाचारण करण्यात आल्यानंतर मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. आधी आरोपीस अटक करा व नंतरच शवविच्छेदन करा अशी भूमीका तेथे जमलेल्या नागरीकांनी घेतली. तपासास योग्य दिशा मिळणार नसल्याने शवविच्छेदन होणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितल्यावर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी परवानगी दिली.




























































