
मुंबईकरांना खड्डेमुक्त, टिकाऊ आणि मजबूत रस्ते देण्यासाठी यापुढे सर्व रस्ते काँक्रीटचे करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. यामध्ये आता 1200 किमीचे रस्ते काँक्रीटचे बनवण्यात येणार आहेत. डांबरी रस्ते लवकरच खराब होत असल्याने हा निर्णय घेतल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबईत पालिकेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 2 हजार किलोमीटरचे रस्ते येतात. मजबूत रस्त्यांसाठी पालिकेने 1985 मध्ये पहिल्यांदा रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची सुरुवात केली असून आतापर्यंत 938.87 किलोमीटर लांबीचे रस्ते काँक्रीटचे करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने 1200 किलोमीटरच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर मांडली आहे. मुंबईत आतापर्यंत 938.87 किलोमीटरच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. तर उर्वरित 1 हजार 200 किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. पालिकेने 2020 ते 2022 या दोन वर्षांत 200.91 किलोमीटरच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे सुरू केली आहेत. यातील 163.57 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे.
अतिक्रमणामुळे डांबरी रस्ते खराब
- मुंबईत कमी कालावधीत जास्त पाऊस होतो तर भूजलसाठय़ाची पातळी उच्च आहे. तसेच भौगोलिक रचना, मिश्र वाहनांची वर्दळ घनता यामुळे रस्ते खराब होतात. तसेच भूमिगत सुविधांसाठी होणारे खोदकामही रस्ते खराब होण्याचे कारण आहे.
- रस्त्याशेजारील झोपडपट्टय़ा, रस्त्यांवर होणारे दुकानाचे अतिक्रमण यामुळे रस्ते खराब होत असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळेही रस्ते खराब होतात अशी माहिती प्रशासनाने सादर केली आहे.






























































