
बारावीत नापास झाल्याच्या नैराश्यातून कोथरूडमधील विद्यार्थ्याने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास श्रावणधारा वसाहतीत घडली. निखिल लक्ष्मण नाईक (वय 19, रा. श्रावणधारा वसाहत, कोथरूड) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. यामुळे त्याच्या आई-वडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे.
निखिलचे वडील आचारी असून आई घरकाम करते. त्याने वाणिज्य शाखेतून बारावीची परिक्षा दिली होती. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास ऑनलाईन निकालाल नापास झाल्याचे समजताच त्याने सहाव्या मजल्यावरून उडी मारली. यावेळी इमारतीच्या खाली थांबलेल्या शेखर लहू लोणारे (30) यांच्या अंगावर तो पडला. यामध्ये लोणारे गंभीर जखमी झाले. तर निखिलचा जागीच मृत्यु झाला. त्याच्या आत्महत्येमुळे श्रावणधारा वसाहतीमध्ये शोककळा पसरली आहे. क्रिकेटप्रेमी असलेल्या निखीलने आत्महत्या केल्यामुळे त्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. ऑनलाईन निकाल पाहिल्यानंतर नापास झाल्याचे समजाताच नैराश्यातून विद्यार्थ्याने सहाव्या मजल्यावर जाऊन उडी मारून आत्महत्या केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी सांगितले.





























































