
हैदराबादच्या 13 वर्षीय मुलीने आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर किलोमंजारो सर केले आहे. मुरीकी पुलकिता हसवी असे या मुलीचे नाव आहे. या यशाबद्दल मुरीकी हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मुरीकीने एप्रिल महिन्यात एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम केली होती. त्यानंतर तिने माऊंट किलिमंजारोवर लक्ष्य केंद्रित केले. मुरीकी सांगते, हा एक साहसी अनुभव होता. माऊंट किलिमंजारो असे शिखर आहे, जिथे सर्व ऋतूंचा अनुभव घेता येतो. एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिमेनंतर मला असं वाटू लागलं की मला सप्तशिखरे सर करायची आहेत. 2024 पर्यंत सप्तशिखरे मोहीम फत्ते करण्याच्या दृष्टीने माझी तयारी सुरू झाली आहे.
गिर्यारोहणासाठी मानसिकदृष्टय़ा मजबूत असावे लागते. त्यासाठी योग आणि ध्यानधारणा करत असल्याचे मुरीकीने सांगितले.

























































