
राज्यातील वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) संकलनाला ओमायक्रोनचा मोठा फटका बसला आहे. सरकारने ओमयाक्रोनच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या निर्बंधांमुळे फेब्रुवारी महिन्यात जानेवारीच्या तुलनेत तब्बल 1300 कोटी रुपये कमी जीएसटी संकलन झाल्याचे समोर आले आहे.
जानेवारी महिन्यात राज्यात 20 हजार 704 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. मात्र फेब्रुवारी महिन्यात निर्बंधांमुळे त्यामध्ये घट झाली असून 19 हजार 423 कोटींचे संकलन झाले. राष्ट्रीय पातळीवर जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत 5.6 टक्के घट झाली. फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असल्याने दरवर्षी जानेवारीच्या तुलनेत संकलन कमीच होते. पण ओमायक्रोनच्या लाटेमुळे जानेवारीअखेरीस व फेब्रुवारीत लागू करण्यात आलेले निर्बंध तसेच रात्रीची संचारबंदी याचा संकलनावर परिणाम झाल्याचे वित्त विभागाच्या अधिकाऱयांचे म्हणणे आहे.
आतापर्यंत 1 लाख 97 हजार कोटींचे संकलन
राज्यात चालू आर्थिक वर्षांत 1 लाख 97 हजार 687 कोटी रूपये एवढे जीएसटीचे संकलन झाले आहे. देशात जीएसटी संकलनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. 2020-21 या वर्षांत 1 लाख 42 हजार कोटींचे संकलन झाले होते. फेब्रुवारी महिन्यात कर्नाटकात हजार 176 कोटी, गुजरात 8 हजार 873 कोटी, तामीळनाडू 7 हजार 393 कोटींचे संकलन झाले आहे.





























































