
>> प्रसाद नायगावकर
काही काम न करिता चमकोगिरी करणे आणि सोशल मीडियावर लाईक्स मिळविणे हे भाजप नेत्यांचे नित्याचे काम आहे. अशीच चमकोगिरी करणे एका महिला भाजप पदाधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. उमरखेड पोलिसांनी त्या महिला पदाधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या होत्या. त्या महिलेला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आठवड्यापूर्वी उमरखेड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून दुचाकीवरून शाळेत सोडण्याचा बहाना एका नराधमाने केला. त्यानंतर मुलीला शाळेत न सोडता निर्जनस्थळी त्याने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्या नराधमाला 50 तासात पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हा नराधम सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 12 खुनासह एकूण 25 केस दाखल आहेत. नुकताच हा विकृत तुरुंगातून पॅरोल वर सुटून आला होता. पॅरोलच्या काळातच त्याने हे पाशवी कृत्य केले. या घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. या गुन्हेगाराला फाशी देण्याची मागणी सर्व स्तरातून झाली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अशा घटनेतील पीडितेचे नाव किंवा फोटो अथवा विडिओ समाजासमोर आणण्यास मनाई आहे. असे असले तरी सवंग प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आणि सहानुभूती दाखविण्यासाठी डॉ. साईली शिंदे या भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी मुलीची भेट घेत सोशल मीडियात तिचे नाव आणि फोटो प्रसिद्ध केले. ही बाब स्थानिक जागरूक नागरिक लक्ष्मीकांत मैंड यांच्या लक्षात आली. त्यांनी उमरखेड पोलीस ठाणे गाठून या संदर्भात तक्रार दिली.
त्यांच्या तक्रारीवरून डॉ. साईली शिंदे यांच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण आणि अन्य कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत या महिला पदाधिकाऱ्याला अवघ्या 8 तासात अटक केली होती. पोलिसांनी सायली यांना पुसद न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने सायली यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी चमकोगिरी
उमरखेड मतदारसंघ हा एससी राखीव मतदार संघ आहे. गेल्या दोन टर्मपासून येथे भाजपचे वर्चस्व आहे. या मतदारसंघातून सायली शिंदे या निवडणूक लढविण्यास उत्सुक होत्या. मूळच्या मुंबईच्या रहिवासी असलेल्या सायाली यांच्या उमरखेडमधील वाऱ्या वाढल्या होत्या. या मतदार संघात त्या आपली ओळख निर्माण करू इच्छित होत्या . या हव्यासापोटी त्यांनी कृत्य केले.
डोईजड होऊ नये म्हणून पत्ता कट करण्याचा प्रयत्न
सायली शिंदे यांचे मोठ्या भाजप पदाधिकाऱ्यांसोबत जवळचे संबंध असल्याचे समजते. अटक टाळण्यासाठी त्यांनी मुंबईतील आपल्या ‘गॉड फादर’ ला अनेक फोन केले. महिला पोलिसांशी पण अटक करतेवेळी अरेरावी केली. मात्र, पोलिसांनी आपली भूमिका चोखपणे बजावीत सायली यांना बेड्या ठोकल्या. लक्ष्मीकांत हे स्थानिक भाजप पदाधिकाऱ्याच्या जवळचे आहेत असे समजते. त्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांनी सायली यांचा काटा काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.




























































