अकरावी प्रवेशासाठी 15 ऑक्टोबरपर्यंतची डेडलाइन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रथम सत्र परीक्षा तोंडावर आली तरी अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरूच असून प्रवेशासाठी आता 15 ऑक्टोबरपर्यंत डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे. गणपतीच्या सुट्टीनंतर सहाव्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. या फेरीनंतर अकरावी प्रवेशाला फुलस्टॉप लागण्याची शक्यता होती, मात्र मागील दोन वर्षांच्या प्रवेश स्थितीचा आढावा घेऊन आणखी एका विशेष फेरीचे नियोजन करण्याचा विचार माध्यमिक शिक्षण संचालनालय करीत आहे.

दरवर्षी अकरावीचे ऑनलाइन प्रवेश नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत सुरू असतात. यंदा मात्र 15 ऑक्टोबरपर्यंत सर्व प्रवेश संपविण्याचा विचार शिक्षण संचालनालयाने केला आहे. मागील दोन वर्षी या महिन्यातील झालेले प्रवेश आणि रिक्त जागांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच शिक्षण उपसंचालकांकडून विभागनिहाय प्रवेशाची स्थिती काय आहे, आणखी प्रवेश फेरी राबविण्याची आवश्यकता आहे का, यंदाच्या रिक्त राहिलेल्या जागा, याची माहिती घेऊन अकरावी ऑनलाइन प्रवेश बंद करायचे की आणखी प्रवेशफेरी राबवावी, याचा निर्णय होणार आहे.

सहाव्या फेरीत 2120 विद्यार्थ्यांना प्रवेश

जाहीर झालेल्या सहाव्या विशेष प्रवेश फेरीत अर्ज केलेल्या 2 हजार 696 विद्यार्थ्यांपैकी 2 हजार 120 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. यातील 1 हजार 310 विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेतले आहेत. या फेरीसाठी मुंबई विभागात एकूण 92 हजार 702 जागा उपलब्ध होत्या. प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 30 सप्टेंबरला सायंकाळी
6 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ऑनलाइन सोबतच इनहाऊस, अल्पसंख्याक आणि बायफोकलची प्रवेशप्रक्रियाही यादरम्यान सुरू राहणार आहे.