महाविकास आघाडीला विरोध होता तर अडीच वर्षे मंत्रिमंडळात का राहिलात? उदय सामंतांची बोलती बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जी महाविकास आघाडी झाली त्याबद्दल नाराज होतात, असं प्रतिज्ञापत्रात तुम्ही म्हटले आहे. महाविकास आघाडीला विरोध होता तर अडीच वर्षे मंत्री कसे राहिलात, असा थेट सवाल करत शिवसेना पक्षाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांची बोलतीच बंद केली.

आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे मंत्री उदय सामंत यांची उलटतपासणी झाली. या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वकील देवदत्त कामत यांनी 21 जून 2022ला ‘वर्षा’ या शासकीय बंगल्यावर झालेली बैठक आणि या बैठकीसाठी शिवसेना पक्षाकडून बजावण्यात आलेला व्हीप, शिवसेनेची घटना, पक्षाचे नेते याअनुषंगाने विविध 72 प्रश्न सामंत यांना विचारले. कामत यांनी एकामागून एक विचारलेल्या गोंधळात टाकणाऱ्या या प्रश्नांमुळे मंत्री सामंत यांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे आज दिसून आले.

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जी  महाविकास आघाडी झाली त्याबद्दल नाराज होतात, असे वकील देवदत्त कामत यांनी विचारताच क्षणाचाही विलंब न लावता उदय सामंत यांनी हो मी नाराज होतो असे उत्तर दिले. त्यावर कामत यांनी 2019 ते जून 2022 या काळात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री झालात इतके तुम्ही नाराज होता का? अशी विचारणा केली असता ज्या वेळी मी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यापूर्वीदेखील गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. त्या वेळी जी निवडणूक आपण नैसर्गिक युतीत लढलो, भविष्याच्या कालावधीमध्ये तशाच पद्धतीची कार्यवाही होईल, असं आश्वासन देण्यात आले होते. नक्की पुन्हा काही कालावधीनंतर तुम्ही केलेली मागणी मान्य केली जाईल अशी आमची समजूत काढल्यामुळे, पुन्हा काही कालावधीनंतर भाजपला सोबत घेऊनच सरकार स्थापन केले जाईल, अशा प्रकारचे आश्वासन दिले गेले म्हणूनच मी मंत्रिमंडळात सहभागी झालो, अशी सारवासारव सामंत यांनी केली.

z देवदत्त कामत यांनी मंत्री दीपक केसरकर यांची सुमारे दीड तास उलटतपासणी घेतली तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मी चाहता आहे आणि हे जाहीर सभेतून सांगितले आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

कोणत्याही कागदावर सही केली नसल्याची सारवासारव

देवदत्त कामत यांच्याकडून सामंत यांना शिवसेना विधिमंडळ पक्षाचे पत्र दाखविण्यात आले आणि 21 जून 2022 ला तुम्हाला व्हीप मिळाला आणि त्यावर तुम्ही सही केली, हे खरे आहे का? अशी विचारणा केली त्यावर सामंत यांनी ही माझी सही नाही, हा व्हीप मी स्वीकारलेला नाही, परंतु माझ्या मर्यादित माहितीनुसार व्हीप हा सभागृहातील कामकाजासाठी, मतदानासाठी असतो. आता माझ्या हातात जो कागद ठेवला आहे त्यावरून मला असे वाटते की, हा व्हीप नसून ते पत्र आहे. असा कागद, पत्र किंवा निमंत्रण हे खासगी कार्यक्रमाचेदेखील असू शकते. त्यावर कामत यांनी मला असे म्हणायचे आहे की, हा कागद म्हणजे आपल्याला 2022 रोजी व्हीप क्रमांक 2 स्वीकारल्याची पोहोच आहे. कुठल्याही खासगी कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याचे निदर्शनास आणून देताच मी कोणत्याही कागदावर सही केली नाही, मी व्हीप स्वीकारलेला नाही आणि त्या कागदावरील सही माझी नाही, अशी सारवासारव सामंत यांनी केली.

उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हे नाकारत नाही

पक्षप्रमुखपदाच्या मुद्दय़ावरून देवदत्त कामत यांनी प्रश्न विचारला तेव्हा उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र म्हणून आम्हाला सर्वांना आदर होता. या आदरामुळेच गटनेता निवडीच्या बैठकीच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे होते, असे उत्तर सामंत यांनी दिले. त्यावर कामत यांनी पक्षप्रमुखपदावरून अधिक प्रश्नांची सरबत्ती केली तेव्हा उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख  होते हे नाकारता येत नाही. त्याबाबत निवडणूक आयोगानेही निर्णय दिल्याचे उदय सामंत म्हणाले. अशाच आशयाचे उत्तर मंत्री दीपक केसरकर यांनीही त्यांच्या उलटतपासणीत दिले.

21 जूनच्या बैठकीला ‘वर्षा’वर उपस्थित असल्याची कबुली

सुनील प्रभू यांचा व्हीप मिळाला होता म्हणून तुम्ही 21 जून 2022 च्या ‘वर्षा’ बंगल्यावरील बैठकीला उपस्थित होतात? असा प्रश्न देवदत्त कामत यांनी केला, त्यावर सामंत यांनी 21 जूनला माझे विधिमंडळातील सहकारी गुलाबराव पाटील यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक असल्याचे सांगितले आणि मला निमंत्रण दिले, परंतु ही बैठक कशाबद्दल आहे हे सांगितले नव्हते. मी या बैठकीला मी उपस्थित होतो, अशी कबुली दिली.