
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू कश्मीरमध्ये लष्कराने ऑपरेशन ऑल आऊट सुरू केले असून गेल्या 72 तासांत 16 दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला आहे. रविवारी सकाळी देखील शोपियन जिल्ह्यातील काप्रान बादागुंड भागात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीनंतर या भागातील इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे. जवानांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत.
#JammuAndKashmir: Shopian encounter concludes. Total six terrorists neutralised, one security personnel also died in action. Weapons and warlike stores recovered. pic.twitter.com/RAIm7iw0E1
— ANI (@ANI) November 25, 2018
गेल्या तीन दिवसांपासून लष्कराने दहशतवाद्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. काल कुलगाम जिल्ह्यात व परवा अनंतनाग जिल्ह्यात जवान व दहशतवाद्यामध्ये झालेल्या चकमकीत दहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अनंतनागमध्ये खात्मा करण्यात आलेले सर्व दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबा व हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांमध्ये कार्यरत होते. तर यातील एक दहशतवादी याने पत्रकार शुजात बुखारी यांची हत्या केली होती.
सध्या बर्फवृष्टी, धुकं व थंडीचा फायदा घेत अनेक दहशतवादी हिंदुस्थानात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लष्कराने सध्या दहशतवाद्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे.


























































