
बनावट कागदपत्र तयार करून सुमारे 17 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी नागेबाबा व संस्थेचे चेअरमन यांच्यासह व्यवस्थापक टिकल माजी प. स. सदस्य, राजेंद्र गुगळे, राणी राजेंद्र गुगळे, जयराम गोरक्षनाथ काळे, अमोल मनोहर शिंदे व इतर 8 ते 10 जणांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनई येथील प्रकाश शेटे (45) यांनी दाखल केलेल्या खटल्यात नेवासा न्यायालयाने सोनई पोलिसांकडे गुन्हा दाखल केला होता. प्रकाश पोपट शेटे यांनी नेवासा न्यायालयात धाव घेतली होती. नेवासा न्यायमूर्ती गुंजवटे यांनी कागदपत्रांची शहनिशा करून सोनई पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वी दिले होते. आज सोनई पोलीस ठाण्यात प्रकाश शेटे यांनी नेवासा न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिशिंगणापूर येथील भानुदास यादव बनकर यांची 10 गुंठे जमीन आहे. त्यांची मुले पाराजी आणि लक्ष्मण यांनी ही जमीन 6 लाख रुपयांना विकली, मात्र 4 कोटी रुपयाला व्यवहार झाल्याचे वाचून 20 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटीही भरली होती.
यापैकी एकाने गोरक्षनाथ काळे यांना जनरल पॉवर ऑफ अॅटर्नी करून दिल्याने त्यापैकी 2 एकर क्षेत्र हितेश अविनाश चोरडिया नवी दिल्ली यांना विकली, मात्र चोरडिया काही कारणास्तव नेवासा येथे आलेच नाहीत. दरम्यान, या संधीचा फायदा घेऊन जनरल पॉवर ऑफ अॅटर्नीधारक जयराम गोरक्षनाथ काळे यांनी सदर जमीन स्वत:च्या नावावर करून घेतली. ही जमीन स्वत:ची आहे, असे खोटे भासवून 2020 च्या खरेदी खतात 2019 चे कागदपत्र जोडून नागेबाबापासून एकदा 7 कोटी रुपये व एकदा 10 कोटी रुपये, असे मिळून 17 कोटी रुपयांचे बोगस कर्ज मंजूर करून घेतले. या प्रकरणी शेटे यांनी संभाजीनगर हायकोर्टात 357/2022 नुसार रिट याचिका दाखल केली. हायोर्टाकडून सोनई पोलीस ठाण्यात 27/4/2022 रोजी गुन्ह्यादाखल आदेश दिले, मात्र सोनई पोलिसांनी अदखलपत्र गुन्हा दाखल करता येत नसल्याचा अहवाल दिला. यावेळी कामगार तलाठ्यांनी उताऱ्यात खाडाखोड केली, असे दिसून आले. त्यामुळे नेवासा न्यायालयाने पोलिसांना चपराक दिली. या प्रकरणी नागेबाबा पतसंस्थेने कागदपत्रांची कुठलीही शहानिशा न करता तसेच कागदपत्रांचा शोध अहवाल न घेता कर्ज मंजूर करून दिले. या सर्व कामांमध्ये पतसंस्थेचे चेअरमन कडू भाऊ काळे व्यवस्थापकासह इतर 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.