दोन महिन्यांत 17 हजार किलो प्लॅस्टिक जप्त

29

सामना ऑनलाईन । मुंबई

प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी केल्यापासून अवघ्या दोन महिन्यांत पालिकेने मुंबईतून तब्बल 17 हजार किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त केले. तसेच  सुमारे एक कोटीपर्यंतचा दंड वसूल केला आहे. गेल्या चार वर्षांत जप्त केलेल्या प्लॅस्टिकपेक्षा जास्त प्लॅस्टिक या दोन महिन्यांत जप्त करण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांत पालिकेने केवळ साडेपाच हजार किलो प्लॅस्टिक जप्त केले होते.

गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात प्लॅस्टिकबंदी लागू केली. 23 जूनपासून पालिकेने या प्लॅस्टिकबंदीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली. या अंमलबजावणीला आता दोन महिने झाले असून 31 ऑगस्टपर्यंत तब्बल 17 हजार किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक पालिकेच्या विशेष पथकाने जप्त केले आहे. यामध्ये युज ऍण्ड थ्रो प्रकारच्या प्लॅस्टिकच्या वस्तू आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा समावेश आहे.

23 जूनपासून प्लॅस्टिकबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी पालिका प्रशासनाने 310 निरीक्षकांची पथके तयार केली. मार्केट, दुकाने व आस्थापना आणि परवाना अशा तीन विभागांतील निरीक्षकांचा या पथकात समावेश आहे. निळ्या गणवेशधारी निरीक्षकांचे हे पथक ‘ब्लू स्कॉड’ म्हणून ओळखले जाते. या पथकाने गेल्या दोन महिन्यांत विविध ठिकाणची दुकाने, मॉल, मार्केट, हॉकर्स झोन अशा ठिकाणी धाडी टाकून प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त केले.

प्लॅस्टिकबंदी लागू होण्यापूर्वी मुंबईच्या हद्दीत 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांनाच केवळ बंदी होती, मात्र 23 जूनपासून लागू झालेल्या बंदीमध्ये एकदाच वापरून फेकून दिले जाणारे प्लॅस्टिकचे चमचे, प्लेटस्, ग्लास, स्ट्रॉ, प्लॅस्टिक कंटेनर, सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्या यांनाही बंदी केली आहे. असे प्रतिबंधित प्लॅस्टिक बाळगणाऱयांना पहिल्या वेळी पाच हजार दंड, दुसऱ्या वेळी 10 हजार दंड तर तिसऱया वेळी 25 हजार रुपये दंड कायद्यान्वये केला जात आहे.

  • 23 जूनपासून जप्त केलेले प्लॅस्टिक – 16 हजार 964.18 किलो.
  • जमा केलेला दंड – 97.70 लाख.
  • प्रतिबंधित प्लॅस्टिक आढळलेली दुकाने व आस्थापने – 2 लाख   9 हजार पाचशे एकोणनव्वद

यापूर्वी जप्त केलेले प्लॅस्टिक आणि जमा केलेला दंड

वर्ष         जमा केलेले प्लॅस्टिक (किलो)          जमा दंडाची रक्कम (रुपये)

2014        1 हजार 035.702                        31 लाख 50 हजार

2015        2 हजार 639.268                        80 लाख 45 हजार

2016        1 हजार 131.335                       38 लाख 60 हजार

2017                 369.555                       31 लाख 55 हजार

जून  2018            88.22                          7 लाख 80 हजार

आपली प्रतिक्रिया द्या