सीएसएमटी हेरिटेज गॅलरीत 1928चे वाफेचे इंजिन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 18 जवळ ‘हेरिटेज गल्ली’ नावाने रेल्वेच्या पुरातन वस्तूंचे संग्रहालय विकसित करीत असून येथे भुसावळहून नॅरो गेज रुळांवर धावणारे 1928 मधील वाफेचे इंजिन आणण्यात आले आहे. या इंजिनाचे येथे जतन करण्यात येणार असून लवकरच या संग्रहालयात पर्यटकांना नॅरो गेजचा सलूनही पाहायला मिळणार आहे.

मिरज -लातूर बारसी लाइट रेल्वे 2 फूट 6 इंचाच्या (762 एमएम) नॅरो गेज रुळांवर हे इंजिन धावले होते. विदर्भातील कापूस हे पीक वाहण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेल्या ‘अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ’ शकुंतला रेल्वे मार्गावरही अशाच प्रकारचे वाफेचे इंजिन धावल्याचे म्हटले जात आहे. सध्या हे इंजिन मध्य रेल्वेच्या भुसावळ डिव्हिजन येथून आणण्यात आले असून तेथील डीआरएम कार्यालयासमोर ते ठेवण्यात आले होते. या वाफेच्या इंजिनाची निर्मिती इंग्लंडच्या नॅसमिथ विल्सन ऍण्ड कंपनी, पॅट्रीकोफ्ट, मँचेस्टर येथे झाली होती.

विजेवरचे इंजिनही संग्रहालयात
सीएसएमटी येथे रेल्वेच्या पुरातन वस्तूंचा संग्रह ‘हेरिटेज गल्ली’ नावाने करण्यात आला आहे. येथे आलेले हे दुसरे इंजिन असून यापूर्वी कल्याण येथून एक विजेवर धावणारे इंजिनही येथे आणण्यात आले आहे. ते सर लेस्ली विल्सन कंपनीचे असून पहिल्या इलेक्ट्रिक इंजिनांच्या मालिकेतील एक इंजिन आहे. येथे नॅरो गेजचा सलूनही लवकरच आणण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.