
सामना ऑनलाईन । बंगळुरू
फेसबुक लाईव्ह दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांच्याविरोधात अर्वाच्य भाषा वापरणे दोघांना महाग पडले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून सिद्घराजू आणि जौमराजू अशी दोघांनी नावे आहेत. दोघेही रामनगरा येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी हा व्हिडीओ फेसबुकवरून हटवला आहे. दरम्यान, कर्नाटक पोलिसांच्या या कारवाईला विरोधी पक्ष भाजपने विरोध केला आहे.
वृत्तानुसार, पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तींनी 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर फेसबुक लाईव्ह केले होते. या लाईव्ह व्हिडीओ दरम्यान अटकेत असलेल्या व्यक्तींनी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी, त्यांचा मुलगा निखिल आणि माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांच्याविरोधात अर्वाच्य भाषेचा वापर केला होता आणि शिवीगाळ केली होती. यानंतर कर्नाटक पोलिसांकडे याची तक्रार दाखल करण्यात आली होती.




























































