समृद्धी महामार्गावर मिळणार 24 तास सीएनजी, थेट पाइपलाइनद्वारे होणार पुरवठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समृद्धी महामार्गावर आता 24 तास पाइपलाइनद्वारे सीएनजी उपलब्ध होणार असून, त्या दृष्टिकोनातून तयारीसुद्धा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सीएनजी इंधनासाठी एरवी महामार्गाच्या बाजूंना असलेल्या पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा समृद्धी महामार्गावर दिसणार नाहीत. समृद्धी महामार्गाजवळ थेट पाइपलाइनद्वारे सीएनजीचा इंधन पुरवठा केला जाणार असल्यामुळे नगर व शिर्डीला 24 तास नैसर्गिक इंधन उपलब्ध होणार आहे.

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्प्यातील नागपूर- शिर्डी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या मार्गावरील महत्त्वाचे तीर्थस्थळ असलेल्या शिर्डी येथे येणाऱया भाविकांना कमी वेळेत पोहोचता येणार आहे. समृद्धी महामार्गाची नगर जिह्यातील लांबी 29.40 किलोमीटर असून, कोपरगाव इंटरचेंजपासून शिर्डी 5 किलोमीटर अंतरावर, तर नगर मुख्यालय 110 किलोमीटर अंतरावर आहे.

राज्यातील बहुतांशी रस्ते व महामार्गावर सीएनजी इंधनाचे पेट्रोल पंप कमी संख्येने आहेत. त्यामुळे वाहनचालकांना सीएनजीचे इंधन भरण्यासाठी रांगा लावाव्या लागतात. समृद्धी महामार्गावर थेट पाइपलाइनद्वारे पेट्रोल पंपचालकांना इंधनपुरवठा केला जाणार आहे. सध्या बहुतांशी पेट्रोल पंपांवर टँकरच्या माध्यमातून सीएनजी इंधन पुरवले जाते. बऱयाचदा वेळेवर टँकरचे इंधन मिळत नसल्यामुळे पेट्रोल पंपचालकांना सीएनजी इंधन नसल्याचे फलक लावावे लागतात.शिर्डी व कोपरगाव या परिसरातून जाणाऱया समृद्धी महामार्गावर गॅस ऍथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सीएनजी गॅस पाइपलाइन टाकण्यात आली आहे. त्यामुळे नगर व शिर्डीला 24 तास नैसर्गिक इंधन उपलब्ध होणार आहे.

नगर जिल्ह्यात मोजक्याच पंपांवर सीएनजी

नगर शहरात तीन सीएनजी पंप आहेत. जिह्याच्या ग्रामीण भागातदेखील सीएनजीचे पंप अत्यंत कमी प्रमाणात आहेत. समृद्धी महामार्गावर 24 तास सीएनजीचे इंधन उपलब्ध होणार असल्यामुळे जिह्यातील वाहनचालकांबरोबरच इतर राज्यांतून शिर्डीला येणाऱया भाविकांना सीएनजी इंधनासाठी पंपावर रांगा लावण्याची आवश्यकता भासणार नाही.

वेगमर्यादा ओलांडणाऱया नऊ वाहनांवर कारवाई

समृद्धी महामार्गावर सध्या वाहन चालवताना ताशी 120 किमी इतकी वेगमर्यादा असून, 125च्या वेगाने वाहन चालवणाऱयांवर महामार्ग पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारला आहे. समृद्धी महामार्गाच्या शिर्डी इंटरचेंजवर 13 डिसेंबरला गुजरात पासिंगच्या वाहनावर पहिली दंडात्मक कारवाई झाली. त्यानंतर वाहन वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱया 9 कारचालकांवर कारवाई करण्यात आली असून, एकूण 18 हजारांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती बाभळेश्वर येथील महामार्ग पोलीस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक विशाल सणस यांनी दिली आहे.