
नीट पेपरफुटी प्रकरणात बिहारमधून 13, झारखंड येथून 5, गुजरातच्या गोध्रातून 5 आणि महाराष्ट्रच्या लातूर येथून दोघांना अटक करण्यात आली. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण 24 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. नांदेड एटीएसने लातूरचे दोन शिक्षक संजय जाधव आणि जलील खान उमर खान पठाण तसेच नांदेडचा इरन्ना मशनाजी कोंगलवाव आणि दिल्लीच्या गंगाधर यांच्या विरोधात सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, नीटवरील याचिकांवर सर्वोच्च न्यायलयात 8 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
- नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी करत एनएसयूआयच्या विद्यार्थ्यांनी आज दुपारी दिल्लीतील जंतर-मंतर येथे एनडीए सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. बॅरीकेड्स हटवून संसदेला घेराव घालण्याचा प्रयत्नही विद्यार्थ्यांनी केला.
- केंद्रीय परीक्षा यंत्रणा बंद करून डीसेंट्रलाइज्ड म्हणजेच विपेंद्रीत परीक्षा यंत्रणा राबवा. म्हणजेच राज्य आणि केंद्राच्या वेगवेगळ्या परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे केली आहे.
- राजकीय नेते, उद्योगपती, उच्चपदस्थ अधिकाऱयांनीही या टोळीला हाताशी धरून आपल्या पाल्यांच्या भविष्याची ‘नीट’ सोय करून घेतल्याची धक्कादायक माहिती आहे. दरम्यान, नांदेड एटीएसच्या तक्रारीवरून लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध पेपरफुटी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





























































