
सामना प्रतिनिधी । अलिबाग
जिल्ह्यात पावसाने उशिरा सुरुवात केली असली तरी सध्याच्या घडीला समाधानकारक पाऊस पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 28 धरणांपैकी 25 धरणे शंभर टक्के तुदुंबपणे भरून वाहत आहेत. तर तीन धरणे 75 टक्के भरली आहेत. आतापर्यंत 68 टक्के पाण्याचा साठा धरणात साचला आहे. त्यामुळे रायगडकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे.
रायगडात जून महिना हा कोरडा गेल्याने रायगडकर पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. तर शेतकरीही आकाशाकडे डोळे लावून बसला होता. अखेर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दमदार सुरुवात केली. त्यामुळे रायगडकर सुखावले आहेत.
जिल्ह्यात पावसाने दमदार सुरुवात केली असल्याने 2 ऑगस्टपर्यंत 41774.21मिमी पाऊस पडला असून सरासरी 2610.89 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. मुसळधार पडत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील लघु पाटबंधारे अंतर्गत येणारी 28 धरणे ही भरून वाहू लागली आहेत. 2 ऑगस्ट पर्यंत 28 धरणात 68 दलघमी एवढा पाण्याचा साठा साचला आहे. त्यामुळे रायगडसह नवी मुंबईतील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे.
जिल्ह्यात फणसाड (मुरुड), वावा (तळा), सुतारवाडी (रोहा), आंबेघर (पेण), श्रीगाव (अलिबाग), कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे (सुधागड), कुडकी (श्रीवर्धन), पाभेरी संदेरी (म्हसळा), वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे (महाड), साळोखे, अवसरे (कर्जत), भिलवले, कलोते, मोकाशी, डोणवत (खालापूर), मोरबे, बामणोली, उसरण ही पंचवीस धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर रानवली, कार्ले (श्रीवर्धन) व पुनाडे (उरण) ही तीन धरणे 75 टक्के भरली आहेत.




























































