7 मोटरसायकलींसह 3 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, दोन आरोपींना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल करून 7 मोटार सायकलसह 3 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. या चोरी प्रकरणी दोघांना अटक ही करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर शहर डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शन व पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या नेतृत्वात उदगीर ग्रामीण पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार करून तपास करण्यात येत होता.

मोटारसायकल चोरीतील संशयित आरोपी महाराष्ट्र व कर्नाटक सीमेलगत असलेल्या गावात, परिसरात चोरीच्या मोटरसायकलसह लोकांना भूल थापा देऊन विक्री करीत आहे. या माहितीची शहनिशा व विश्लेषण करून सदर पथकाने ग्रामीण भागात आरोपीचा शोध घेतला असता मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित फारुख रौफ पठाण (23, रा. जम्मूनगर, बिदर गेट जवळ उदगीर), शुभम दत्ता तेलंगे (18, रा. निळे बंद ता. उदगीर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी उदगीर तालुक्यातील विविध ठिकाणांहून मोटरसायकल चोरी करून ग्रामीण भागात कमी किमतीत मोटरसायकल विकल्याचे सांगितले. या माहितीनुसार, आरोपींकडून सात मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींकडून गुन्हे उघड होण्याची शक्यता असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे उदगीर ग्रामीणचे पोलीस अंमलदार राहुल नागरगोजे हे करीत आहेत. 7 मोटरसायकलसह 3 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार, पोलीस ठाणे उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार राम बनसोडे, राहुल नागरगोजे, तुळशीराम बरुरे, राहुल गायकवाड, सचिन नाडागुडे यांनी पार पाडली.