
प्रसिद्ध अभिनेता यश याच्या वाढदिवशी त्याचे बॅनर लावण्याचा प्रयत्न करत असतानाच तीन चाहत्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना कर्नाटकातील गडग जिल्ह्यात घडली असून या दुर्घटनेत आणखी तीन जण जखमी झाले आहेत.
यश सोमवारी त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते श्रीहट्टी भागात एक लोखंडी फ्रेम असलेले बॅनर लावत होते. विजेच्या खांबाजवळ हा बॅनर लावत असताना त्याची मेटल फ्रेम विद्युत प्रवाह असलेल्या तारेला लागून त्या फ्रेममधून विद्युत प्रवाह पास झाला. त्यामुळे ही फ्रेम लावत असलेल्या सहा जणांना विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले. तिन्ही जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हनुमंथ हरिजन, मुरली नादुविनामनी, नवीन गाजी अशी मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांच्या मृत्युची बातमी कळताच अभिनेता यश याने त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. या प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृतांच्या नातेवाईंकांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत जाहीर केली आहे.
























































