इस्त्रो भेटीसाठी दापोलीतून 3 विद्यार्थी रवाना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्त्रो भेटीसाठी दापोलीतील 3 विद्यार्थी रवाना झाले त्यांना शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांच्या पालकांनी तसेच दापोलीकरांनी उपस्थित राहून कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ‘जाणू विज्ञान अनुभवो विज्ञान’, या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील 27 विदयार्थी इस्त्रो नासा भेटीसाठी निवडले गेले आहेत. निवडलेल्या जिल्ह्यातील 27 विद्यार्थ्यांमध्ये दापोलीतील शिरसोली येथील धनश्री जाधव, जालगाव जि. प. शाळेतील तनिष्का बोधगावकर, तर मळे येथील सुयश गोसावी या 3 विद्यार्थ्यांचा इस्त्रो भेटीत समावेश आहे. दापोली शहरालगतचे जालगाव वगळता शिरसोली तसेच मळे ही तालुक्यातील दुर्गम गावे आहेत. या दुर्गम गावात राहणाऱ्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेवर इस्त्रो तसेच नासा भेटीसाठी आपले स्थान पक्के केले. त्यानुसार, इस्त्रोला जाण्यासाठी दापोलीतील 3 विद्यार्थी रत्नागिरीतून अन्य विद्यार्थ्यांसोबत जाणार आहेत. त्यासाठी दापोली तालुक्यातील जालगाव जिल्हा परिषद शाळा येथून इस्त्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेस भेट देण्यासाठी रविवारी रवाना झाले.

नियोजनानुसार, रत्नागिरी ते पणजी मोटारीने तर पणजी ते बेंगलोर विमानाने प्रवास करणार आहेत. इस्त्रो भेटीसाठी निघालेल्या या 27 विद्यार्थ्यांचा बेंगलोर येथील हॉटेल रिझेंटा येथे मुक्काम असणार आहे. त्यानंतर सोमवारी 17 जानेवारी रोजी सकाळी सर विश्वेश्वरय्या म्युझियम पाहणी करून दुपारी बेंगलोरहून त्रिवेंद्रमला विमानाने विद्यार्थी प्रवास करतील त्रिवेंद्रमला रात्री मुक्काम करून मंगळवारी, 18 जानेवारीला विक्रम साराभाई स्पेस सेंटर, इस्त्रो रॉकेट लॉंचर पाहणी, स्पेस म्युझियम पाहणी करून परतीचा प्रवास करतील.

अशा प्रकारचा रत्नागिरी जिल्ह्यातील 27 विद्यार्थ्यांचा इस्त्रो दौरा आहे. इस्त्रो अभ्यास पाहणी दौऱ्यासाठी दापोलीतून रविवारी निघालेल्या दापोलीतील धनश्री जाधव, तनिष्का बोधगावकर आणि सुयश गोसावी या विद्यार्थ्यांना दापोली पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल सावंत,रामचंद्र सांगडे,कल्याणी मुळये आणि नोडल ऑफिसर बळीराम राठोड यांनी शुभेच्छा देत रत्नागिरीसाठी रवाना केले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक तसेच दापोलीकरांनीही शुभेच्छा देण्यासाठी आपली उपस्थिती लावली होती.