रत्नागिरीत 360 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान, 4338 उमेदवार रिंगणात

रत्नागिरी जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतींमध्ये 914 प्रभागात उद्या सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. 914 प्रभागातून 4338 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 986 मतदान केंद्रांवर 4 लाख 59 हजार 121 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 2 लाख 37 हजार 498 स्त्री मतदार आणि 2 लाख 21 हजार 613 पुरुष मतदारांचा समावेश आहे.

मतदान प्रक्रियेसाठी 223 विभागीय अधिकारी, 1125 केंद्र अध्यक्ष, 3365 मतदान अधिकारी, 1004 शिपाई कार्यरत राहणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी 1004 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात 479 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. जिल्ह्यात 360 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक लढत होत असून उद्या मतदान होणार आहे. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात 13 ग्रामपंचायतीत 30 प्रभागांसाठी 31 मतदान केंद्रांवर 13197 मतदार मतदान करणार आहेत. दापोली तालुक्यात 42 ग्रामपंचायतीत 99 प्रभागांसाठी 106 मतदान केंद्रांवर 54631 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

खेड तालुक्यात 64 ग्रामपंचायतीत 156 प्रभागांसाठी 157 मतदान केंद्रांवर 62424 मतदार मतदान करणार आहेत. चिपळूण तालुक्यात 61 ग्रामपंचायतीत 148 प्रभागांसाठी 163 मतदान केंद्रांवर 79506 मतदार मतदान करतील.

गुहागर तालुक्यात 16 ग्रामपंचायतीत 38 प्रभागांसाठी 43 मतदान केंद्रांवर 19951 मतदार मतदान करतील. संगमेश्वर तालुक्यात 62 ग्रामपंचायतीत 158 प्रभागांसाठी 167 मतदान केंद्रांवर 77561 मतदार आपला हक्क बजावतील.

रत्नागिरी तालुक्यात 41 ग्रामपंचायतीत 132 प्रभागांसाठी 163 मतदान केंद्रांवर 90584 मतदार मतदान करतील. लांजा तालुक्यात 19 ग्रामपंचायतीत 43 प्रभागांसाठी 44 मतदान केंद्रांवर 17345 मतदार मतदान करतील.

राजापूर तालुक्यात 42 ग्रामपंचायतीत 110 प्रभागांसाठी 112 मतदान केंद्रांवर 43927 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.

आपली प्रतिक्रिया द्या