भाजपच्या सत्ताकाळात बँक घोटाळ्यातील 38 आरोपी देशाबाहेर पळाले, केंद्र सरकारची संसदेत कबुली

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपची सत्ता आल्यानंतर बँक घोटाळ्यातील तब्बल 38 आरोपी देशाबाहेर पळून गेले आहेत. सीबीआय ज्या बँक घोटाळ्यांचा तपास करत आहे त्यातील हे आरोपी आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी संसदेत ही माहिती दिली.

सीबीआयने दिलेल्या अहवालानुसार 1 जानेवारी 2015 ते 31 डिसेंबर 2019दरम्यान बँकांमधील आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणांत गुंतलेल्या 38 आरोपींनी पलायन केले. यातील 20 आरोपींच्या विरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जाहीर करण्यासाठी ईडीने इंटरपोलकडे विनंती केली आहे. 14 आरोपींच्या प्रत्यार्पणासाठी विविध देशांत अर्ज करण्यात आले आहेत. फरार आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018 नुसार 11 लोकांविरुद्ध कारवाईसाठी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री ठाकुर यांनी दिली आहे.

आर्थिक घोटाळा प्रकरणांत पळून गेलेल्यांपैकी सनी कालरा आणि विनय मित्तल यांना देशात परत आणले आहे. कालरा यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेत 10 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. तर मित्तल यांच्यावर विविध बँकाना 40 कोटी रुपयांना फसविण्यात आल्याचा आरोप आहे.

घोटाळेबाजांच्या यादीत मल्ल्या, चोक्सी, नीरव मोदीचा समावेश

देशाबाहेर पळालेल्या या आरोपींमध्ये 9000 कोटींचा घोटाळा करणारा विजय मल्या, 12,000 कोटींच्या बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी, पंजाब नॅशनल बँकमध्ये 14 हजार कोटींचा घोटाळा करून लंडनमध्ये पळालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याच्या परिवारातील लोकांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या