
सामना ऑनलाईन । डेहराडून
उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथे एक प्रवासी बस खोल दरीत कोसळून ४७ प्रवासी ठार झाले आहेत. या अपघातात ११ प्रवासी जखमी झाले असून त्यातील चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. पोलीस व एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. या बसमधील सर्व प्रवाशी हे देवदर्शनासाठी गेले होते असे समजते.
ही बस भौन तालुक्यातून रामनगरला जात होती. त्यावेळी धुमकोट येथील एका वळणावर भरधाव वेगात असलेल्या या बसवरीलस चालकाचा ताबा सुटला व बस दरीत कोसळली. या घटनेनंतर पोलीस व एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली. बचाव पथकाने स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांनी या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमी व्यक्तींचा उपचाराचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तसेच जखमींसाठी देखील लवकरच मदतीची घोषणा करण्यात येईल, असे रावत यांनी सांगितले.

























































