
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रशियन सैन्यात भरती झालेल्या २१७ हिंदुस्थानी नागरिकांपैकी ४९ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण बेपत्ता आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली. तसेच सैन्य सेवेतून मुक्त करण्यात आलेल्या १३९ हिंदुस्थानी नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी मॉस्कोतील हिंदुस्थानचे दूतावास सातत्याने प्रयत्न करत असल्याचे केंद्राने न्यायालयाला सांगितले.
मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी ही माहिती सादर केली. रशियाने ६ हिंदुस्थानी नागरिक बेपत्ता असल्याची पुष्टी केली असली, तरी आणखी २३ जणांच्या स्थितीबाबत अद्याप कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.
रशियन सैन्यात कार्यरत असलेल्या काही हिंदुस्थानींच्या नातेवाईकांनी त्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून पुरेशी मदत मिळत नसल्याची तक्रार केली होती. यावर उत्तर देताना भाटी यांनी सांगितले की, हिंदुस्थानचे दूतावास रशियन अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात असून मृत्यू झालेल्या तसेच बेपत्ता व्यक्तींची माहिती पडताळून पाहण्याचे काम सुरू आहे. तसेच सैन्य सेवेतून मुक्त झालेल्या नागरिकांच्या हिंदुस्थानात परतीसाठीही सक्रिय मदत केली जात आहे.
४८ विमानतिकिटांची व्यवस्था
भाटी यांनी न्यायालयाला सांगितले की, इंडियन कम्युनिटी वेल्फेअर फंड अंतर्गत आतापर्यंत ४८ विमानतिकिटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना परत येण्यास मदत झाली आहे.
आकर्षक वेतन आणि नागरिकत्वाचे आमिष
रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाही मोठ्या संख्येने हिंदुस्थानी नागरिक रशियन सैन्यात का दाखल होत आहेत, याबाबत केंद्राने न्यायालयात स्पष्टीकरण दिले. रशियाकडून परदेशी नागरिकांना आकर्षक वेतन, सामाजिक सुरक्षा, भरपाई, नागरिकत्व आणि तुरुंगवासातून मुक्ततेचे आमिष दाखवले जात असल्याचे सरकारने सांगितले.
केंद्राच्या माहितीनुसार, रशियन सैन्यात सामील होणाऱ्यांना सुमारे ५,००० अमेरिकी डॉलरचे प्रारंभिक साइनिंग बोनस, दरमहा २,५०० अमेरिकी डॉलर वेतन, रशियन नागरिकत्व, विविध सामाजिक लाभ आणि मृत्यू झाल्यास १.६८ लाख अमेरिकी डॉलरपर्यंत भरपाई देण्याचे आश्वासन दिले जाते.
दोन हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची प्रकरणे
सरकारने न्यायालयाला सांगितले की, किशोर सारवनन आणि साहिल महामधुसेन माजोठी या दोन हिंदुस्थानी विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांच्या गुन्ह्यांत शिक्षा भोगत असताना माफी मिळवण्यासाठी रशियन सैन्याशी करार केला होता.
त्यापैकी किशोर सारवनन याची हिंदुस्थान सरकारच्या हस्तक्षेपानंतर सैन्यातून सुटका करण्यात आली. मात्र त्याने रशियातच राहून तेथील नागरिकत्व स्वीकारले. दुसरीकडे साहिल माजोठी याने युक्रेनियन सैन्यासमोर शरणागती पत्करल्याची माहिती असून त्याच्या प्रकरणाचा पाठपुरावा हिंदुस्थान सरकार युक्रेनकडे करत आहे.
तसेच कोलकात्याच्या आशीम कुमार चॅटर्जी याला हिंदुस्थान सरकारच्या हस्तक्षेपामुळे रशियन अधिकाऱ्यांनी सैन्यात भरती करण्यास नकार दिल्याचेही केंद्राने स्पष्ट केले.
नुकसानभरपाईसाठी प्रयत्न
मृत नागरिकांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक मदत दिली जात असल्याचेही केंद्राने सांगितले. हिंदुस्थानच्या दूतावासामार्फत रशियन अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आलेल्या चार दाव्यांपैकी एका कुटुंबाला नुकसानभरपाई मिळाली आहे, तर स्वतंत्रपणे सादर करण्यात आलेल्या आणखी तीन दाव्यांनाही मंजुरी मिळून संबंधित कुटुंबांना भरपाई देण्यात आली आहे.
डीएनए नमुने रशियाकडे पाठवले
बेपत्ता व्यक्तींचा शोध आणि मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी २१ कुटुंबीयांचे डीएनए नमुने गोळा करून रशियन अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याची माहितीही केंद्राने दिली.
याचिकेतील २६ जणांपैकी १४ जणांचा मृत्यू
सर्वोच्च न्यायालयात केंद्राने सांगितले की, याचिकेत नमूद करण्यात आलेल्या २६ व्यक्तींमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ११ जण बेपत्ता असल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी कळवले आहे. उर्वरित एका व्यक्तीला विनयभंग प्रकरणात दोषी ठरवून आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्या व्यक्तीला एप्रिल २०२४ मध्ये अटक झाली होती आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये शिक्षा सुनावण्यात आली.
दरम्यान, युद्धग्रस्त भागात सुरू असलेल्या संघर्षामुळे मृत हिंदुस्थानी नागरिकांचे पार्थिव शोधणे किंवा बाहेर काढणे सध्या शक्य नसल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी हिंदुस्थान सरकारला कळविल्याची माहितीही न्यायालयात देण्यात आली.



























































